नागपूर,
Railway News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बेशिस्त प्रवाशांविरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत १ हजार ६५४ प्रकरणे नोंदविण्यात आली.
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनात विभागातील मार्गांवर रेल्वेस्थानक विविध आणि रेल्वेगाड्यांमध्ये १ ते १० मार्चपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात विनातिकीट प्रवास करणारे, जनरलचे घेऊन एसी डब्यात प्रवास करणारे, लगेज सोबत घेऊन प्रवास करणारे, रेल्वेगाडी, तसेच स्थानक परिसरात घाण करणारे आणि प्रतिबंध असूनही रेल्वेस्थानक परिसर किंवा रेल्वेगाड्यात, पान खर्रा खाऊन पिचकार्या मारणारे, विड्या-सिगारेटचे झुरके मारणारे असे एकूण १ हजार ६५४ प्रवासी आढळले. त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंडापोटी २९ लाख ४ हजार ९७० रुपये वसूल आले. ही कारवाई सुरू राहणार असून, प्रवाशांनी तिकीट घेऊनच रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करावा आणि रेल्वेच्या संपत्तीचे जतन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.