नागपूर,
Ganesh Naik-Ramesh Kharmale : वाॅटरमॅन आणि माजी सैनिक रमेश खरमाळे यांच कार्याची दखल घेणारा विशेष लेख आज दै. तरुण भारतच्या आकांक्षा या साप्ताहिक पुरवणीत प्रकाशित झाला. या लेखाची दखल घेत, खुद्द राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचे काैतुक केले. दै.तरुण भारतकडून, रमेश खरमाळे यांचा भ्रमणध्वनी मिळवून, मंत्रीमहाेदयांनी त्यांच्याशी संवाद साधला.
विशेष म्हणजे वन दिनानिमित्त शुक्रवारी वन विभागाच्या वन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रमेश खरमाळे यांना वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पदक देऊन गाैरविण्यात आले हाेते. ‘घरच्या माेठ्या व्यक्तीकडून, आपल्या कुटूंबप्रमुखाकडून शाबासकीची थाप मिळाल्याचा आनंद आज झाला. आपल्या कामाची पावती मिळाल्याचे समाधान झाले. कालचे क्षण आनंदाचे तर आजचे नि:शब्द करणारे हाेते,’ वनरक्षक खरमाळे म्हणाले.
गेल्या दाेन दशकांपासून जलसंवर्धन करण्यासाठी सपत्नीक 3 हजारांवर चर खाेदणारे, 5 हजारांवर वृक्षलागवड करणारे रमेश खरमाळे हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर वनविभागात वनरक्षक म्हणून रुजू झालेल्या रमेश यांनी जुन्नर तालुक्यातील पाण्याची समस्या ओळखून, काम सुरू केलं. त्यांच्या कार्याची माहिती देणारा मुलाखतपर लेख आजच्या (दि.22 मार्च) अंकात प्रकाशित झाला आहे.
‘आज वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वत: फोन करून अभिनंदन केलं, हा आनंद शब्दांपलिकडचा आहे. आमच्या लहानशा प्रयत्नांची त्यांनी दखल घेणं, ही आनंद आणि प्राेत्साहन देणारी गाेष्ट आहे. अगदी वन दिनाच्या काल झालेल्या कार्यक्रमात ते मंचावर असताना, आम्ही लांबून त्यांना बघत हाेताे. पण, तरुण भारतातील ‘आकांक्षा’ पुरवणीत प्रकाशित संपूर्ण माहिती वाचून त्यांनी स्वत: फोन केला, ही माझ्यासाठी खूप माेठी गाेष्ट आहे,’ भारावलेल्या आवाजात रमेश खरमाळे यांनी ही प्रतिक्रीया दिली.