राजस्थान
Jaisalmer border राजस्थानमधील जैसलमेर सीमेवरील मोहनगड कालवा परिसरातून सुरक्षा यंत्रणांनी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे. पठाण खान (वय ४०) असे या संशयिताचे नाव असून, तो चंदन, जैसलमेरमधील करमो की धानी येथील रहिवासी आहे. पठाण खानवर भारतीय लष्करी क्षेत्राचे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानला पाठवल्याचा गंभीर आरोप आहे.
गुप्त माहितीसाठी सतत संपर्क
सूत्रांच्या माहितीनुसार, पठाण खानचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात आणि २०१९ मध्ये त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर तो नियमितपणे पाकिस्तानला लष्करी माहिती पुरवत असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांनी संशयाच्या आधारे त्याच्यावर लक्ष ठेवले होते. त्यानंतर संयुक्त तपास समितीने (JIC) त्याला ताब्यात घेऊन जैसलमेर येथे आणले आहे. सध्या त्याचा मोबाईल तपासला जात असून, त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.
१८ मार्च रोजीही संशयित अटकेत
या प्रकरणाआधी १८ मार्च रोजी नाचना परिसरातही एक संशयित आढळून आला होता. पोलिसांनी त्याला नूर्स मिलजवळ अटक केली. त्याच्याकडून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गंगानगर आणि हरियाणाचे बनावट आधार कार्ड तसेच एक मोबाईल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, हा संशयित कधी स्वतःला रवी किशन, तर कधी शाही प्रताप असे वेगवेगळ्या नावांनी ओळख देत होता.
सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढली
जैसलमेर हा भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेला महत्त्वाचा जिल्हा असल्याने बीएसएफचे जवान येथे नेहमीच तैनात असतात. मात्र, आतून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असून, या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. तसेच, या कारवायांमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.सुरक्षा यंत्रणांनी सीमावर्ती भागातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून, संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.