बुलडाणा,
Prataprao Jadhav : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम वितरित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे.
सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत खरीप रब्बीच्या 80:110 मॉडेल नुसार शेतकंऱ्यांना प्रिमियमनुसार 110% नुकसान भरपाई देणे गरजे होते. त्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा करून यासंदर्भात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीमध्ये ते दृकश्राव्य पद्धतीने सहभागी झाले होते. या बैठकीत विमा कंपनीच्या सोबतही चर्चा करण्यात आली होती, व 110% नुकसान भरपाईच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अनुक्रमे 181,06,99,279 व 63,14,67,780 रुपये असे एकूण 2,44,21,67,059 रुपयांची रक्कम पीक विमा कंपनीला अदा करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मंजुर व प्रलंबित नुकसान भरपाई तपशील
खरीप हंगाम सन 2023-24
मंजूर नुकसान भरपाई : रु. 253.09 कोटी (292389 शेतकरी)
नुकसान भरपाई वाटप : रु. 138.54 कोटी (210289 शेतकरी)
प्रलंबित नुकसान भरपाई : रु. 114.55 कोटी (82100 शेतकरी)
रब्बी हंगाम सन 2023-24
मंजूर नुकसान भरपाई : रु. 200.67 कोटी (158384 शेतकरी)
नुकसान भरपाई वाटप : रु. 124.97 कोटी (56826 शेतकरी)
प्रलंबित नुकसान भरपाई : रु. 75.70 कोटी (101558 शेतकरी)
एकूण
मंजूर नुकसान भरपाई : रु. 453.76 कोटी (450773 शेतकरी)
नुकसान भरपाई वाटप : रु. 263.51 कोटी (267115 शेतकरी)
प्रलंबित नुकसान भरपाई : रु. 190.25 कोटी (183658 शेतकरी)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगाम सन 2023-24 अंतर्गत एकुण रु.453.76 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर झाली असून त्यापैकी अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीने (एकुण प्रिमियम रकमेच्या 110 टक्के) रु. 263.51 कोटी इतकी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित नुकसान भरपाई वाटपाकरिता खरीप हंगाम सन 2023-24 साठी रु.114.55 कोटी आणि रब्बी हंगाम सन 2023-24 साठी रु. 75.70 कोटी असे एकुण रु.190.25 कोटी इतक्या रकमेकरिता शासनाने मान्यता दिली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीस निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विमा कंपनीमार्फत प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. काही दिवसात नुकसान भरपाईची रक्कम संबंधित पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन देण्यात आली आहे.