अमरावती,
Amravati-Mumbai flight बहूप्रतीक्षित अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांच्या टेकऑफची प्रतीक्षा संपणार आहे. विमानतळ इमारत निर्माणसह विविध प्रकारचे काम पूर्ण झाले असून नागरी उड्डाण मंत्रालयाच्या उड्डाणा संदर्भातील परवानगीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. एप्रिलमध्ये अमरावती ते मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.

खा. बोंडे यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत प्रगतीत असलेल्या विमानतळाच्या कामकाजाची पाहणी देखील केली. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झालेले आहे. धावपट्टी, इमारत निर्माण यासह सुसज्ज विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या आहेत. त्या संपूर्ण कामकाजाचा आढावा डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. यावेळी विमानतळाच्या श्रीमती चावला, भूषण जिरापुरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. Amravati-Mumbai flight नागरी उड्डयण संचालनालयाकडे उड्डाणा संदर्भातील आवश्यक असलेल्या परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात बेलोरा विमानतळावरून प्रत्यक्षात उड्डाणाला सुरुवात होणार आहे. प्रथम अमरावती ते मुंबई ७८ आसनी क्षमतेचे विमान बेलोरा विमानतळावरून टेकऑफ करणार आहे. या फ्लाईटला एटीआर असे म्हणतात. त्यामुळे लवकरच अमरावतीकरांची अमरावतीवरून विमान प्रवासाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. त्यानंतर रात्रकालीन प्रवासाची सुविधा देखील विमानतळ प्राधिकरणाकडून विकसित केली जाणार असल्याची माहिती सुद्धा डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.