नागपूर,
Satyanarayan Nuwal : यशाऐवजी नैतिकतेची निवड करा, असा हितोपदेश संरक्षण क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांनी आज समस्त तरुणाईला गेला. रामदेवबाबा विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या लीडरशिप कनेक्ट उपक्रमांतर्गत, विद्यापीठाने पहिल्यांदाच एका प्रेरणादायी फायरसाईड चॅटचे आयोजन केले.
या विशेष संवादात सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष, तसेच फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये 57व्या क्रमांकावर असलेले सत्यनारायण नुवाल यांनी जीवन, मूल्य व नेतृत्व यावर अत्यंत अंतर्मुख करणारे विचार मांडले. सोलार इंडस्ट्रीज सध्या 10 हजारांहून अधिक कर्मचाèयांना रोजगार देणारी, भारतातील प्रमुख संरक्षण व स्फोटके उत्पादक कंपनी आहे. या उपक्रमांतर्गत सत्यनारायण नुवाल यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी व एक सामान्य कुटुंबातून जागतिक उद्योगाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना अनुभवता आले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या आघाडीच्या उद्योगपतींनी तेवढेच शांत, संयमी उत्तरे दिली. अनेक महत्त्वाचे क्षण उलगडून सांगितले. पहिलं यश 17व्या वर्षी, एक निर्यात एजंट पहिले कंत्राट मिळाले. विसाव्या वर्षीचं ध्येय, इन्क बनवणं, प्रिंटिंगचं प्रशिक्षण, फक्त व्यवसाय हाच ध्यास.
अपयश काय शिकवतं- यशापेक्षा अपयश आपल्याला अधिक शिकवतो. सर्वात मोठं आव्हान- देशातील सर्वात मोठा स्फोटक व्यापारी झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रात विश्वास मिळवणं कठीण होतं. पण, मला संधी दिसली. 70 टक्के संरक्षण आयात भारतातच तयार होऊ शकते.
व्यवस्थापन धडा- विश्वासार्हता, कौशल्य व सर्वांना एकत्र आणण्याची क्षमता. नेतृत्वाचा मंत्र- पुरवठादार, कर्मचारी व ग्राहकांसाठी पारदर्शक धोरणं. तरुण उद्योजकांसाठी सल्ला- सुखद क्षेत्राच्या बाहेर पडा. मेहनतीला पर्याय नाही. जीवन मंत्र- ‘क्रतमया पुरुषाय’- माणूस जसा विचार करतो, तसाच घडतो. सर्वात मौल्यवान शिकवण- नेहमी नैतिकतेची निवड करा. समस्या ओळखा, संधी साधा, नम्र राहा.
कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांनी सांगितले की, सत्यनारायण नुवाल हे मानवता, कौशल्य, आजीवन शिकण्याची क्षमता व बुद्धिमत्ता यांचा उत्कृष्ट संगम आहेत. हीच मूल्ये रामदेवबाबा विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवू इच्छिते.
श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे सरचिटणीस राजेंद्र पुरोहित, सोलार इंडस्ट्रिजचे राघव नुवाल, आयआयआयचे संचालक डॉ. राजीव खरे, डॉ. रूपेश पायस विशेषत्वाने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. राजेश पांडे, प्राचार्य डॉ. मनोज चांडक, डॉ. दीप्क्षिका मेहरा, विविध विभागांचे संचालक, अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.