सांगली,
Bhide Guruji : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी, माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये, त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत.
संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
संभाजी भिडे गुरूजींची प्रकृती उत्तम आहे, कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्राथमिक उपचार करून भिडे गुरुजींना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. दरम्यान, येथील भटक्या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. त्यानंतर संभाजी भिडे यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, या घटनेनंतर सांगली महापालिकेनेही भटक्या कुत्र्यांसंदर्भात कारवाईची माोहिम हाती घेतली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येतो आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून भटके कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.