नागपूर,
Dr. Babasaheb Ambedkar Law College नागपूरकरांना आता शिल्परूपात संविधानाच्या प्रस्तावनेचे धडे मिळणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एक आगळे वेगळे उद्यान तयार करण्यात येत आहे. अद्वितीय अशा या प्रस्तावना उद्यानाचे मुख्य उद्दिष्ट अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने शिल्पांच्या आणि चित्रांच्या माध्यमांनी सामान्य नागरिकांना संविधानाची प्रस्तावना, त्यातील मूल्ये, नैतिक तत्त्वे समजावून सांगणे हे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानातील योगदान अधोरेखित करणाऱ्या या उद्यानात प्रस्तावनेत नमूद केलेल्या मूल्यांचे चित्रण १० भित्तिचित्रे आणि मुर्त्यांद्वारे प्रदर्शित केले जात आहेत.

या १० Dr. Babasaheb Ambedkar Law College भित्तिचित्रांद्वारे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवाद, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या मूल्यांसह लोकशाहीचा कणा असणारी जनता आणि संविधानाची प्रस्तावना याबद्दल माहिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविले जाणार आहे. या उद्यानाच्या मध्यस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती देखील तयार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर भारतीय संसद, भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवन यांचे फायबर मॉडेल देखील येथे तयार करण्यात येत आहे. उद्यानात खुले रंगमंच साकारण्यासाठी दोन एलईडी स्क्रीन उभारल्या जाणार आहेत. जेणेकरून उद्यानाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना भारतीय संविधानाबद्दल दृकश्राव्य माध्यमाने अधिकाधिक ज्ञान प्राप्त होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने हा उद्यान महाविद्यालयाच्या इतिहासातील प्रमुख उपक्रमांपैकी एक मानले जात आहे.
उद्यानाच्या मुख्य द्वाराचे विशेष महत्व
या अद्वितीय उद्यानाच्या मुख्य द्वाराचे विशेष महत्व आहे. मुंबईस्थित चैत्य भूमीच्या मुख्य द्वाराची हुबेहूब प्रतिकृती या उद्यानाच्या मुख्य द्वाराच्या स्वरूपात साकारली जात आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे निर्माण कार्य सुरु असून येत्या १ ते २ महिन्यात हे उद्यान संपूर्णपणे तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. या भव्य प्रवेशद्वाराचे निर्माण करण्यासाठी थेट कलकत्त्यावरून कारीगरांना बोलविण्यात आले आहे. या प्रवेशद्वारावर अगदी बारकाईने कोरीव काम केले जात आहे.
अभिमानास्पद बाब
महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षात महाविद्यालयाच्या परिसरात तयार होत असलेल्या प्रस्तावना उद्यान हे जणू एक मोठे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. याचा लाभ जनसामान्यांना भारतीय संविधानाची मूल्ये अगदी सोप्या पद्धतीने समजण्यासाठी होणार आहे. असा हा आगळा वेगळा अद्वितीय प्रस्तावना उद्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात पूर्णत्वास येत आहे ही फार अभिमानास्पद बाब आहे.
- डॉ. रविशंकर मोर, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर