नितीन गडकरी यांना ‘डॉक्टरेट’

19 Apr 2025 21:49:42
नागपूर, 
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने डॉक्टरेट (डी. एस्सी., डॉक्टर ऑफ सायन्स) प्रदान करण्यात आली. या डॉक्टरेटमुळे नितीन गडकरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 
 
 
GADKARI
 
 
 
विद्यापीठाच्या वतीने आयोजित 26व्या दीक्षांत समारोहामध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे नितीन गडकरी यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे शनिवारी 19 एप्रिलरोजी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. इंद्र मणी यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक सोहळ्यात ही डॉक्टरेट प्रदान केली.
 
 
जल संवर्धन, जैव इंधन विकास, जैविक व नैसर्गिक शेती, कृषी वैविध्यीकरण, ग्रामीण विकासामध्ये नितीन गडकरी यांच्या अमूल्य योगदानासाठी ही डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
 
 
नितीन गडकरी यांना याआधी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम राज्यातील विद्यापीठानी डॉक्टरेटने गौरविले आहे. यामध्ये राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोलाचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, औरंगाबादटचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उत्तर प्रदेशचे गलगोटियाज विद्यापीठ, गुवाहाटीचे आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ, गाझियाबादचे एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0