नागपूर,
Yogananda Kale passes away राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू योगानंद काळे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २० एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता अंत्य संस्कार करण्यात येतील. त्यांचे पार्थिव राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ते ८८ वर्षांचे होते. डॉ. काळे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील राहणारे. आर्थिक परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.कॉम, एम.फील, डीबीएम आणि पीएच.डी मिळविली. पीएच.डी.तील ‘विदर्भाचा आर्थिक अनुशेष’ हा त्यांचा शोधप्रबंध बराच गाजला. अर्थशास्त्र विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकीक होता. धरमपेठ कला, वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली. तिथेच उपप्राचार्य आणि त्यानंतर प्राचार्य म्हणूनही काम केले. यानंतर त्यांनी विद्यापीठामध्ये विविध पदांवर काम केले.

विद्यापीठात १९९५ साली प्र-कुलगुरू पदाची धुरा सांभाळून त्यांनी विद्यापीठाची घडी बसवली. सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आणि विद्यापीठाच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची तऱ्हा त्यातून ते अधिक लोकप्रिय ठरले. प्रभावी वक्ते, कुशल प्रशासक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यातही स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. अनेक संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. Yogananda Kale passes away शिमला येथील प्रतिष्ठित शासकीय संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे ते सदस्यही होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (ता.२०) सांयकाळी सहा वाजता सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.