'फुले' या चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी वाद

19 Apr 2025 12:04:22
मुंबई,
phule movie प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ब्राह्मण समुदायाविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी माफीनामा जाहीर केला असला तरी वाद अजूनही शमलेला नाही.
 

phule movie 
या प्रकरणावर केंद्रीय मंत्री सतीश दुबे यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'एक्स' (पूर्वीचा ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याला उत्तर देताना त्यांनी अनुराग कश्यपला 'नीच बदमाश' असे संबोधले. तसेच, "हा नीच बदमाश अनुराग कश्यप संपूर्ण ब्राह्मण समुदायावर घाण पसरवून सुटू शकेल असे त्याला वाटते का? जर त्याने ताबडतोब जाहीरपणे माफी मागितली नाही, तर मी शपथ घेतो की त्याला कुठेही शांती मिळणार नाही याची मी खात्री करेन," असे संतप्त शब्दांत त्यांनी म्हटले.
दरम्यान, अनुराग कश्यपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. "जे बोलून गेले ते मागे घेता येणार नाही, पण ब्राह्मण समाजाने माझ्या कुटुंबातील महिला आणि मुलांवर भाष्य करू नये," असे त्याने नमूद केले.
ही संपूर्ण घटना समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी वाद सुरू असताना घडली. अनुराग कश्यपने या चित्रपटाच्या प्रदर्शनात होणाऱ्या विलंबावरून सेन्सॉर बोर्ड, केंद्र सरकार आणि ब्राह्मण समाजावर टीका केली होती. त्यानंतर काही वापरकर्त्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला असता त्याने ब्राह्मणांवर लघवी करण्यासारख्या आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.
त्यानंतर एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस कारवाईची मागणी केली आहे.
'फुले' हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, जातीयवाद पसरवण्याच्या आरोपांमुळे तो पुढे ढकलण्यात आला असून आता तो २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Powered By Sangraha 9.0