तभा वृत्तसेवा
ढाणकी,
water problem : शहरातील विहिरी आटल्या आहेत, पंधरापंधरा दिवस नळाला पाणी नाही. पंधरा दिवस पाणी साठवणूक करून ठेवायचे तर डायरिया, मलेरिया, टायफाईड, किडनी, मुतखडा, असे अनेक आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकात प्रचंड रोष निर्माण झाला असून ढाणकीतील पाण्याची समस्या कधी मिटवणार, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
या संदर्भात खासदार अथवा आमदारांनी अद्यापही विधान भवनात प्रश्न मांडला नाही. पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे की, ज्या दिवशी नळ येतील त्यादिवशी मजूरदारांना आपली मजुरी बुडवून घरी रहावे लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जगावे का, पोटासाठी जगावे, हा गंभीर प्रश्न जनतेपुढे पडला आहे.
नागरिकांनी दाद मागायची तर कुठे ? उबाठा ठाकरे शिवसेना गटाचे स्थानिक नेते व भाजपाचे स्थानिक नेत्यांनीसुद्धा आमदार व खासदाराकडे ढाणकीच्या भीषण पाणीटंचाई निवारणा संदर्भात मागणी केली नाही. आता लोकप्रतिनिधी ही मागणी कधी पूर्ण करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.