विद्यापीठाच्या ४५ उन्हाळी परीक्षांचे निकाल ३० दिवसात घोषित

७ दिवसात घोषित केले जाणार

    दिनांक :20-Apr-2025
Total Views |
नागपूर,
rtmnu result राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित होण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम टप्प्यात घेण्यात आलेल्या तब्बल ४५ उन्हाळी परीक्षांचे निकाल ३० दिवसात घोषित करण्यात आले आहेत. प्रथम टप्प्यात झालेल्या १५० परीक्षांचे निकाल देखील आगामी ७ दिवसात घोषित केले जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर यांनी दिली.
 
 
rtmnu result
परीक्षा विभागाकडून दिनांक १९ मार्चपासून उन्हाळी परीक्षेस सुरुवात झाली असून २७ मार्चला परीक्षा संपल्या होत्या. यादरम्यान विद्यापीठाच्या वतीने तब्बल ११०० हून अधिक परीक्षा पार पडल्या. विविध टप्प्यांमध्ये या परीक्षांचे संचालन परीक्षा विभागाकडून करण्यात आले. मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन फर्स्ट सेमिस्टर (सीबीसीएस) या परीक्षेचा निकाल सर्वात अगोदर ११ एप्रिल रोजी घोषित करण्यात आला. त्यानंतर एकूण २१ विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल १५ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले. तर उर्वरित २३ परीक्षांचे निकाल गुरुवार, दिनांक १७ एप्रिल रोजी घोषित करण्यात आले. पुढील अभ्यासक्रमास तसेच अन्य विद्यापीठात शिक्षण घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे तातडीने निकाल लावण्याची सूचना कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिली होती.
त्यादृष्टीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर यांनी लवकरात लवकर परीक्षांचे निकाल कसे लागतील, याचे नियोजन केले. विद्यापीठाने या परीक्षांचे निकाल ३० दिवसात लावले आहेत. अन्य परीक्षांचे निकाल देखील तातडीने लावले जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर यांनी दिली आहे.