वर्धा जिल्ह्यातील ४५ पर्यटक काश्मिरात; पहेलगाम येथे कोणीच नाही

    दिनांक :23-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Pahalgam attack वर्धा जिल्ह्यातून काश्मीर येथे फिरायला गेलेल्यांपैकी ४५ पर्यटक काश्मिरात अडकले आहेत. त्यापैकी ९ पर्यटक श्रीनगरमध्ये तर ३६ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आहेत. गोळीबार झाला तेव्हा वर्धा जिल्ह्यातील कोणताही पर्यटक पहेलगाम येथे नव्हता. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या ३६ पर्यटकांना उद्या २४ रोजी दिल्लीत खास बसने आणल्या जाणार आहेत. त्यानंतर ते पर्यटक वर्धेकडे येतील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घोरपडे यांनी सांगितले.
 

wardha pahalgam 
 
या ३६ पर्यटकांमध्ये नाचणगाव, आपटी येथील ३२ पर्यटक असल्याची माहिती आ. राजेश बकाने यांनी दिली. त्यांना पर्यटक देशपांडे यांच्यासोबत संपर्क करून माहिती घेतली. पहेलगामपासुन काही अंतरावर पर्यटक अडकलेले आहे. स्थानिक मिलिटरीची बटालीयन नंबर २९ आम्हाला मदत करीत आहेत. पर्यटकांना घ्यायला येणारी वाहनं कमी आणि पर्यटक जास्त अशी परिस्थिती झाली आहे. पहेलगाम येथील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी होत असल्याचे ७ ते ८ किमीची लाईन लागली असल्याची माहिती देशपांडे नामक पर्यटकांनी आ. राजेश बकाने यांना सांगितले. कोणतीही अडचण आल्यास आपल्यासोबत संपर्क करा. केंद्र व राज्य सरकार आपल्याला मदत करेल, असा विश्वास आपण त्यांना दिल्याची माहिती आ. बकाने यांनी दिली.
या संदर्भात आपटी येथील काश्मीर येथे पर्यटनाकरिता गेलेले देशपांडे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की आम्ही १६ रोजी नागपूर, हिंगणघाट, पुलगाव, आपटी येथील ७ ते ८ परिवारातील ४० जण पहाटे पर्यटनासाठी निघालो. १७ रोजी सायंकाळी ४ वाजता कटरा येथे पोहोचलो. वैष्णोदेवी करून आम्ही श्रीनगर येथुन ट्रॅव्हल्स व एक छोटे वाहन करून प्रवासासाठी निघालो. परतीच्या प्रवासात कटर्‍याकडे येत असतानाच श्रीनगरहून १० किमी अंतरावर गोळीबार झाल्याची माहिती सीआरपीएफच्या जवानांनी दिली. आपण स्वत: मिलिटरीमध्ये असल्याचे त्यांना सांगितले. जम्मूपर्यंत पोहोचवून देण्याची विनंती केली. परंतु, पुढे जाता येणार नाही, सर्व रस्ते बंद असल्याचे त्यांनी सांगितले.Pahalgam attack मग, थांबायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी श्रीनगरपासुन १२ किमी अंतरावर असलेल्या बडगाव येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ४ दिवसांपासुन आम्ही मुकामाला आहोत. जवान आम्हाला मदत करीत आहेत. परंतु, मनात कुठेतरी भीती आहे. आम्हाला इथुन निघायचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक श्रीनगर येथे पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत आमची फोनवर चर्चा झाली. ते आम्हाला भेटायला येणार असल्याची माहिती आपटी येथील देशपांडे यांनी श्रीनगर येथुन तरुण भारतसोबत बोलताना दिली.
 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने संपर्क देण्यात आला असून जम्मू कश्मीर येथे पर्यंटनासाठी गेलेल्या पर्यंटकांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०७१५२-२४३४४६, २९९०१० किंवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांच्या ८८८८२३९९०० किंवा सहाय्यक महसूल अधिकारी विजया फटींग यांच्या ८८०५७४१२४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाह निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सचिव श्रीपती मोरे यांनी केले आहे.
वर्धा जिल्ह्यातील संपर्क झालेले सर्व ४५ पर्यंटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत व ३६ नागरिक हॉटेल ब्राईट पॅलेस चंदननगर पहलगाम येथे वास्तव्यास होते. हे सर्वजन सुखरुप असून जम्मूसाठी प्रस्थान केले आहे. जिल्हा प्रशासन भ्रमणध्वनीद्वारे संपर्कात असून सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.