हिंगणघाट,
Dr. Ramdas Ambatkar संघटना, कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे आज ३० रोजी दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरला चेन्नई येथे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. माजी आ. डॉ. रामदास हे त्यांच्या किडनी संबंधित उपचारासाठी एमजीएम हेल्थकेअरला चेन्नई येथे उपचार घेत होते. डॉ. रामदास आंबटकर संघटनेसाठी आणि चळवळीचा एक मोठा आधार होते. त्यांच्या मागे पत्नी गीता, वृद्ध आई, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

माजी आमदार रामदास आंबटकर यांचा जन्म हिंगणघाट तालुयातील वडनेर येथे झाला. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर हिंगणघाट त्यानंतर वर्धेतील जेबी सायन्स विद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. यवतमाळे वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते दत्ताजी डिडोळकर यांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. विद्यार्थी परिषदेत ते १३ वर्षे पुर्णवेळ होते. संघटनमंत्री म्हणून त्यांनी विद्यार्थी परिषद गावागावात पोहोचवली. आज विद्यार्थी परिषदेची फळी गावागावात उभी आहे हे त्यांचेच योगदान आहे. नागपूर विद्यापिठावर ते सिनेट सदस्य म्हणून निवडून येत व्यवस्थापन समितीचे सदस्य होते.
पश्चिम विदर्भ संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत भाजपाचे काम पोहोचवत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीसही होते. त्यानंतर भाजपाने त्यांना वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद)वर निवडून आले. २०२३ च्या मे महिन्यात ते विधान परिषदेतून निवृत्त झाले. त्यानंतर काही महिन्यातच ते आजारी झाले. आज त्यांची प्राणज्योत मालवली.