नवी दिल्ली,
Gram Chikitsalay ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करणारी आणि एका तरुण डॉक्टरच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगणारी ‘ग्राम चिकित्सालय’ ही ओरिजिनल वेब सिरीज ९ मे रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लोकप्रिय ‘पंचायत’ या वेब सिरीजला टक्कर देणारी अशी ही मालिका ‘द वायरल फीवर’च्या (TVF) बॅनरखाली तयार करण्यात आली असून, दिग्दर्शन राहुल पांडे यांनी केले आहे.
या मालिकेची निर्मिती दीपक कुमार मिश्रा यांनी केली असून, कथा वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. ही पाच भागांची मालिका आहे. यामध्ये अभिनेता अमोल पाराशर आणि विनय पाठक प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा आणि गरिमा विक्रांत सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
ही कथा Gram Chikitsalay का पो आहे डॉक्टर प्रभात या महत्वाकांक्षी शहरी डॉक्टरची, जो एका दूरच्या ग्रामीण भागात बंद पडलेल्या सार्वजनिक आरोग्य केंद्राला पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, या प्रवासात त्याला सरकारी यंत्रणेच्या अडचणी, स्थानिक लोकांची शंका आणि लहान गावांतील अनोख्या समस्यांचा सामना करावा लागतो.प्राइम व्हिडीओ इंडिया चे कंटेंट लायसेंसिंग डायरेक्टर मनीष मेंघानी म्हणाले, “प्राइम व्हिडीओवरील आमचा उद्देश फक्त मनोरंजन पुरवण्यापुरता मर्यादित नाही. भारताच्या सांस्कृतिक विविधतेला समर्पित असलेल्या आणि जागतिक प्रेक्षकांशी जोडणाऱ्या कथा सादर करणं, हे आमचं ध्येय आहे. ‘ग्राम चिकित्सालय’ ही सिरीज ग्रामीण भारताच्या हृदयाशी जोडलेली आहे आणि कॉमेडी व सामाजिक भाष्य यांचं सुरेख मिश्रण आहे.”
‘द वायरल फीवर’चे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले, “ही सिरीज ग्रामीण आरोग्यसेवेतील अडचणी आणि यशस्वी प्रयत्नांचे चित्रण अतिशय हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी पद्धतीने करते. डॉक्टर प्रभातच्या प्रवासातून आपण त्या संघर्षाला समजून घेतो जिथे आदर्शवादाची टक्कर वास्तवाशी होते. ही सिरीज केवळ एक कथा नाही, तर परिवर्तनाच्या प्रक्रियेचं दर्शन घडवते.”