Neem पारंपरिक आयुर्वेदात आणि भारतीय संस्कृतीत कडुलिंबाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. केवळ पूजेमध्येच नव्हे, तर विविध आजारांवर नैसर्गिक उपचार म्हणूनही कडुलिंबाचा वापर केला जातो. अलीकडील संशोधनातूनही कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने मधुमेह, पचनाचे विकार आणि त्वचेसंबंधी त्रासांपासून आराम मिळतो, हे स्पष्ट झाले आहे.
फायदे
कडुलिंबाची पाने त्यांच्या तीव्र कडवट चवेमुळे जरी सर्वांना आवडत नसली, तरी त्यामध्ये लपलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ४-५ ताजी पाने चावून खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. हायपोग्लायसेमिक गुणधर्मामुळे ही पाने इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत वाढ करतात, जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.याशिवाय, पाचनसंस्थेच्या तक्रारींवरही कडुलिंब प्रभावी उपाय आहे. अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते पोट स्वच्छ ठेवते आणि हानिकारक जिवाणूंना नष्ट करते. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या समस्या दूर करण्यासाठीही ते उपयुक्त आहे.फक्त अंतर्गत नव्हे, तर बाह्य सौंदर्यासाठीही कडुलिंब उपयोगी आहे. त्वचेवरील मुरुम, फोड, इन्फेक्शनसाठी कडुलिंबाचा रस किंवा पेस्ट उपयुक्त असून, केसगळती व कोंड्यावरही ते प्रभावी उपाय ठरतो.
कडुलिंबाचे फायदे मिळवण्यासाठी ते योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे. अति सेवन केल्यास पोटदुखी किंवा रक्तातील साखर अत्यल्प होण्याची शक्यता असते. विशेषतः गर्भवती महिलांनी व लहान मुलांनी सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.कडुलिंब ही निसर्गाची दिलेली एक अमूल्य देणगी असून, त्याचा समावेश आपल्याला आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेतो.