नागपूर,
Amethi University Noida अमेठी विद्यापीठ नोएडा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवात विद्यापीठाच्या चमुने स्कीट, समूहगान तसेच प्रश्नमंजुषा या तीन प्रकारात सहभाग नोंदविला होता. यातून स्कीट आणि समूहगान प्रकारात विद्यापीठाच्या चमुने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांचा सत्कार जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य प्रथमेश फुलेकर, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना कला कधीही जात, धर्म, लिंगभेद याचा विचार करीत नाही, त्यामुळे भारतीय संविधानाचे प्रतिबिंब कलेत पहावयास मिळते, असे प्रतिपादन डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले. पुढे बोलताना विद्यार्थी म्हणून सांस्कृतिक गरजांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करीत तुमच्यातील कलावंत जपा असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या समूहगान तसेच स्किट प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांचा कुलगुरूंच्या शुभहस्ते मेडल तसेच प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला. समूहगान संघामध्ये वसंतराव नाईक शासकीय समाज विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी तेजस्विनी खोडतकर, सुयोग देवळकर व चेतन नागोसे, आर.एस. मुंडले महाविद्यालयाची राधा ठेंगडी, एलएडी महाविद्यालयाची आयुशी देशमुख, विसेन्ट पलौटी महाविद्यालयाची निधी इंगोले, सिटी प्राईम कॉलेजची निधी रानडे, हिस्लॉप महाविद्यालयाची इंद्राणी इंदुरकर, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील याज्ञिक बंगाले यांचा समावेश होता. स्किट चमूमध्ये विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागातील नितीन मरसकोल्हे, हिस्लॉप महाविद्यालयातील मोहित सरकार, इंद्राणी इंदुरकर, चिराग शुक्ला व शिफा अन्सारी तर व्हिएमव्हीचा युगलहंस मरकप यांचा समावेश होता. स्किटचे दिग्दर्शन तथा प्रशिक्षक म्हणून सारंग गुप्ता यांनी कार्य पाहिले. संघ व्यवस्थापक म्हणून ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, सारंग गुप्ता यांनी सहभाग घेतला. समूहगान डॉ. दीपश्री पाटील यांनी संगीतबद्ध केले. प्रशिक्षक म्हणून सोनाली बोहरपी तर सांस्कृतिक समन्वयक म्हणून प्रकाश शुक्ला यांनी जबाबदारी पार पाडली.