‘तू-मी एक रक्त’अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम

07 Apr 2025 13:39:45
 विशेष 
 
 : रेवती जोशी-अंधारे

Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt

 अनेक दुर्गम वनक्षेत्रांमध्ये निसर्गाशी एकरूप होऊन आपले जीवन जगणारे आपले कोट्यवधी जनजाती बांधव, हजारो वर्षांच्या सनातन परंपरा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात अनमोल योगदान देत आहेत. आपल्या मूळ संस्कृतीच्या या आदीरक्षकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या श्रद्धा व परंपरेच्या रक्षणासाठी गेल्या सात दशकांपासून अविरतपणे कार्यरत असलेली एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम!
 
 
 
Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
 
 
 

Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt

 जशपूर (छत्तीसगड) या जनजातीबहुल आणि त्याच वेळी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या वाढत्या प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात, वनवासी कल्याण आश्रमाची मुहूर्तमेढ वर्ष 1952 मध्ये रोवली गेली. जनजाती क्षेत्रातील दारिद्र्य, निरक्षरता आणि मागासलेपणाचा फायदा घेऊन होणारे धर्मांतरण आणि त्यामुळे नष्ट होणारी मूळ संस्कृती पाहून जागरुक जन व्यथित झाले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि मागासवर्गीय जाती कल्याण विभागाचे प्रादेशिक सह-समन्वयक, रमाकांत (बाळासाहेब) देशपांडे यांनी या कार्याला आपलं जीवन समर्पित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पं.रविशंकर शुक्ल आणि प्रसिद्ध गांधीवादी नेते ठक्कर बाप्पा यांच्या सहमतीने, बाळासाहेबांनी सरकारी नोकरीचा त्याग करून स्वतःला पूर्णपणे या कार्यात झोकून दिले. सुरुवातीला एका लहानशा शाळेच्या माध्यमातून त्यांनी या सेवायज्ञाची सुरुवात केली.
 
 
 Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
कल्याण आश्रमाच्या कार्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर, 25 डिसेंबर 2002 या दिवशी सुवर्ण जयंतीपूर्तीचे वर्ष दिल्लीत साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण देशभर जिल्हा व प्रांतीय स्तरावर उत्सवांचं आयोजन झालं. एकूण 42,746 गावांमध्ये संपर्क साधण्यात आला आणि 12,50,000 वनवासी कुटुंबांमध्ये भारतमातेची सन्मानचित्रं पोहचली. वनवासी समाजात समरसता प्रस्थापित 10,800 नगरवासी आणि वनवासी कार्यकर्ते एकत्र आले. झारखंडच्या रांची येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात एका लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. समारोप समारंभात देशभरातील 300 आदिवासी समाजांचे 2500 प्रतिनिधी सहभागी झाले. पारंपरिक पोशाखात, नृत्यासह वनवासी समाजाची शोभायात्रा निघाली आणि रोमांचित करणारा भारत माता की जयचा गजर दुमदुमला. या अधिवेशनात वनवासी कार्यातील अडचणींवर उपायांबाबत चर्चा झाली आणि महत्त्वाचे ठरावही पारित करण्यात आले. हा महोत्सव राष्ट्रभावनेचा, समरसतेचा आणि सांस्कृतिक जागृतीचा दीपस्तंभ ठरला.
 
 
 
सेवा, शिक्षण आणि स्वावलंबन या उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी विकासाची पंचसूत्री अंमलात आली.
1) शिक्षा आणि वसतिगृह (एकल विद्यालय) : Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
सुदूर वनवासी भागांमध्ये अजूनही शिक्षणाच्या सुविधा पोहचविण्याची आजही अत्यंत गरज आहे. अनेक छोटुकल्यांना प्राथमिक शाळेसाठी 3 ते 4 कि.मी. पायपीट करावी लागते. तर, माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हास्थानी जावं लागतं. महाविद्यालयीन शिक्षण तर प्रयत्नांतीच मिळते आणि त्यासाठी आपलं गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. शिकण्याची जिद्द असणाèया या मुलांना कल्याण आश्रम वनवासी भागात औपचारिक व अनौपचारिक शिक्षण देत आहेत. आज संस्थेच्या माध्यमातून 1,314 एकल शाळा आणि 3,585 प्रकल्प कार्यरत आहेत. संस्थेच्या कार्यातून 1,17,920 विद्यार्थी लाभान्वित होत आहेत. बालवाडी, रात्रशाळा, पुस्तकालय अशा विविध प्रकल्पांमार्फत शिक्षण व संस्कार दिले जातात. एकूण 206 वसतिगृहांमधून 7,556 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ष 1952 मध्ये जशपूरपासून या कार्याची सुरुवात झाली.
 
 
 
वसतिगृहांमध्ये शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास, योग, प्रार्थना, आरती, संस्कार, राष्ट्रभक्ती, समाजभान आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो. या शाळांमधून घडलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक यश मिळवलं आहे. कल्याण आश्रमचे माजी विद्यार्थी डॉक्टर, शिक्षक, संशोधक आणि प्रशासक बनून समाजसेवेत कार्यरत आहेत. तर, काहींनी विज्ञान, साहित्य आणि कलेतही नाव कमावलं आहे. ईशान्य भारतातील विशेष परिस्थितीत कल्याण आश्रमने स्थानिक मुलांसाठी वसतिगृहांची सुरुवात केली. आज या माध्यमातून 49 आदिवासी जमातींचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
 
 
 
2) वनवासी आरोग्य सेवा (कल्याण आश्रम)Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
वनवासी समाजात आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा हा एक यक्षप्रश्न आहे. शुद्ध पाणी, पोषक आहार, योग्य उपचार यांचा अभाव आणि दुर्गम भागातील वास्तव्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट होतात. या पार्श्वभूमीवर कल्याण आश्रमाने संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा प्रकल्प उभे केले आहेत. वर्ष 1978 मध्ये कल्याण आश्रमचा अखिल भारतीय स्वरूपात विस्तार झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी बस्तर, ओदीशा, झारखंड आणि ईशान्य भारतात सेवा सुरू केली. बस्तरमध्ये डॉ. विश्वामित्र यांनी झाडाखाली बसून उपचार केले. डॉ. पंकज भाटिया यांनी माणसांसोबत जनावरांचाही विचार केला आणि त्यांच्यावरही उपचार केले.
डॉ. रामगोपाल, डॉ. राजीव बिंदल, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. शशि ठाकुर, डॉ. मृगेन्द्र सिंह, डॉ. सुरेंद्र शर्मा यांनी दुर्गम भागात दशकभर सेवा केली.
 
 
 
केरळच्या मुत्तिलमध्ये विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये सिकेलसेल आणि अ‍ॅनिमियावर मोठे काम झाले. विशेष म्हणजे आयुर्वेदीक वनौषधींचा दस्तावेज तयार करण्यात आला. महाराष्ट्रात यावर आधारित मराठी पुस्तिका प्रसिद्ध झाली. देशभरात 2517 आरोग्य रक्षक प्रशिक्षित झाले असून ते डब्ल्यूएचओ-मान्य औषधांद्वारे उपचार करतात. या माध्यमातून एकूण 251 दैनिक व साप्ताहिक आरोग्य केंद्रे चालतात आणि वर्षभरात 12 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार होतात. राजस्थानमध्ये खुजली निर्मूलन, महाराष्ट्रात फळझाड लागवड, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांचा वापर यामुळे जनजागृती झाली. आरोग्य रक्षकांकडून आरोग्य सेवा देतानाच सामाजिक जागृती, स्वधर्माभिमान आणि श्रद्धास्थळ निर्मितीही झाली. वनवासी समाजाचा साधेपणा लक्षात घेऊन, त्यांना समर्पित, संवेदनशील आणि समजूतदार डॉक्टर्सची गरज आहे.
 
 
 
3) वनवासी समाजातील महिला जागृती : Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
 वनवासी समाजात महिला घरकाम, शेती, पशुपालन, वनउत्पन्न संकलन व विक्रीपासून ते बाजारहाटापर्यंत सर्व जबाबदाèया समर्थपणे पार पाडतात. धार्मिक उत्सव, ग्रामसभा, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असतो. कल्याण आश्रमाच्या स्थापनेपासूनच महिलांचा सहभाग होता. पण, वर्ष 1973 मध्ये लीलाताई पराडकर यांच्या कार्यप्रवेशाने महिला कार्य अधिक संघटित झाले. पहिले महिला वसतिगृह जशपूरमध्ये सुरू झाले. पुढे रायपूर, भानपुरी, पुरुलिया अशा अनेक ठिकाणी महिला वसतिगृह स्थापन झाले. बालवाड्या, संस्कार आणि सत्संग केंद्रांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढला. वर्ष 1985 मध्ये भिलाईमध्ये अखिल भारतीय महिला संमेलन भरले. 1200 महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. नागालँडच्या राणी माँ गाईदिन्ल्यू व महाराष्ट्राच्या अनुताई वाघ त्यावेळी उपस्थित होत्या. आरोग्य, स्वावलंबन, शिक्षण, ग्रामविकास, अन्यायाविरोधातील लढा यावर महिलांनी प्रभावी कार्य केलं आहे.
 
 
 
 
श्रद्धा जागरण, अस्पृश्यतेचे निर्मूलन, दारू बंदी, शिक्षकांची नियमितता, बालसंस्कार केंद्रे, आरोग्यविषयक कार्य आणि ग्रामस्वच्छतेसाठी उपक्रम राबवले. वर्ष 2008 मध्ये रांचीत 34 प्रांतांतील 1820 महिला कार्यकर्त्यांचं भव्य महिला संमेलन झालं. तब्बल 17,500 बहिणींचा शोभायात्रेत समावेश, 20 हजारांवर वनवासी महिलांची उपस्थिती आणि 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाल्यामुळे हा सोहळा प्रेरणादायी ठरला. नागरी भागातील महिलाही झपाटून काम करत आहेत. वनवासी भगिनींना वस्तुरूप/आर्थिक सहाय्य, उत्सवांमध्ये सहभाग, वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी अध्यापनाचे कार्य करतात. यामुळे, ‘तू-मी एक रक्त’ हा भाव नाते दृढ करतो. सध्या 1391 गावांतील 2252 बचत गटांमधून 30,000 हून अधिक महिला लाभार्थी आहेत. भाजी उत्पादन, माध्यान्ह भोजन, लघुद्योग यामुळे कुटुंबांची स्थिती सुधारली आहे.
 
 
 
4) एकलव्य क्रीडा प्रकल्प : Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt
कल्याण आश्रमच्या स्थापनेनंतर 37 वर्षांनी, 1985 मध्ये एकलव्य क्रीडा प्रकल्प सुरू झाला. पुण्याचे क्रीडा शिक्षक अशोक साठे यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 1987 मध्ये मुंबईच्या शिबिरातून या उपक्रमाची मूळ कल्पना साकारली. वर्ष 1988 मध्ये मुंबईत पहिला राष्ट्रीय वनवासी क्रीडा महोत्सव आयोजिण्यात आला. एकूण 15 प्रांतांतील 392 खेळाडूंनी सहभाग घेतला. यानंतर, वर्ष 1991 मध्ये इंदूर, वर्ष 1995 मध्ये उदयपूर, वर्ष 2000 मध्ये रांची आणि वर्ष 2005 मध्ये अमरावतीत क्रीडा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. त्यात शेकडो खेळाडू सहभागी झाले. या महोत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच, घोषयात्रा, पॅराशूट शो, मल्लखांब अशा विविध कार्यक्रमांनी एकतेचा आणि शक्तीचा अद्भुत संगम घडला. वर्षभर विशिष्ट खेळांवर आधारित अखिल भारतीय स्तरावर वार्षिक स्पर्धाही घेतल्या जातात. राजस्थानच्या झाला-कुवा गावातील नरेश डामोर याला कल्याण आश्रमने दीड लाखाचे तीरधनुष्य दिले आणि त्याने या संधीचं सोनं केलं. त्याने वर्ष 2007 मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले. भारतासाठी टर्की, थायलंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर इथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्याने विजयी कामगिरी केली.
 
 
 
या सर्वंकष प्रयत्नांतून वनवासी युवक-युवतींमध्ये आत्मभान, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्व निर्माण झालं आहे. समाजातील संवाद वाढला आणि सामाजिक कुंठा घटली. एकलव्य क्रीडा प्रकल्प हे केवळ खेळाचे नव्हे, तर संस्कार आणि आत्मविकासाचे राष्ट्रनिष्ठ प्रशिक्षण क्षेत्र बनलं. वनवासी कल्याण आश्रमाच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे आज हजारो जनजाती गावांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. शिक्षण केंद्रे, आरोग्य शिबिरे, धर्मांतरणविरोधी मोहिमा, गोसेवा प्रकल्प, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे, महिला प्रशिक्षण योजना या उपक्रमांच्या वर्ष 2009 च्या आकडेवारीच्या तुलनेत आज दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शिक्षणामुळे नवी पिढी आत्मविश्वास मिळवत आहे, आरोग्य सुधारले आहे, महिला बचत गटांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत
 
 
 
Vanvasi Kalyan Ashram-Tu Main Ek Rakt आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दलचा अभिमान वाढीस लागला आहे. ‘तू-मैं एक रक्त’ म्हणजे, आपण सर्व एकाच रक्ताचे, एकाच राष्ट्राचे अविभाज्य अंग आहोत, ही भावना समाजात रुजतेय. एक सशक्त, सुशिक्षित, स्वावलंबी आणि आपल्या सनातन परंपरेशी जोडलेला जनजाती समाज, जो विराट हिंदू समाजाचा अविभाज्य अंग म्हणून अभिमानाने उभा राहील, हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे स्वप्न आहे. या संस्थेचे मागील सत्तर वर्षांचे कार्य हा भारतभर वनवासी बांधवांच्या उन्नतीचा यशस्वी प्रयोग ठरत आहे. ही केवळ समाजसेवा नाही, तर ते एका महान संस्कृतीचे रक्षण आणि राष्ट्रशक्तीचे संवर्धन आहे.
 
(संदर्भ : वनवासी कल्याण आश्रमाविषयी प्रकाशित साहित्य आणि ऑनलाईन माहिती)
Powered By Sangraha 9.0