यवतमाळात ‘बॉम्बस्फोट’

पोलिसांनी केली रंगीत तालीम

    दिनांक :10-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Yavatmal News : भारत पाकीस्तान युद्धाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी होणाèया दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्ब स्फोट प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धती संबंधाने जिल्हा पोलिस दलाच्या वतीने शनिवार, 10 मे रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान नवीन बस स्थानक, येथे ‘बॉम्ब कॉल’ची रंगीत तालीम करण्यात आली.
 
 
y10May-Talim
 
या तालीमेच्या अनुषंगाने येथील नवीन बसस्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. कोणतीही जिवित अथवा वित्तहानी होऊ न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच श्वान पथकाद्वारे संपूर्ण घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.
 
 
या बॉम्ब असलेल्या बॅगला नवीन बस स्थानकासमोरील निर्मनुष्य केलेल्या ठिकाणी नेऊन या बॉम्ब डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करून निकामी करण्यात आला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाद्वारे घटनास्थळावरील भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. या घटनेदरम्यान थांबवून ठेवलेली रस्त्यावरील गर्दी ही वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली.
 
 
त्यानंतर ही कार्यवाही म्हणजे पोलिस विभागातर्फेच घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचे मेगा फोनद्वारे नागरिकांना सांगण्यात आले. ही रंगीत तालीम पोलिस अधीक्षक कुमार चिंता व उपअधीक्षक विजय नाफडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यात दहशतवाद विरोधी शाखा प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सारंग बोम्पीलवार, बॉम्ब शोधक व नाशक पथक उपनिरीक्षक उल्हास परांडे, उपनिरीक्षक संजय धवणे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सतीश चवरे, रामकृष्ण जाधव, प्रशांत कावरे, यशोधरा मुनेश्वर, ज्ञानोबा देवकते, ज्ञानेश्वर मुंडाले, वैद्यकीय अधिकारी व अग्निशामक दल यांचा सहभाग होता.
नागरिकांना केले प्रशासनाने आवाहन
 
 
एखादा बॉम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी काय करावे, तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत या रंगीत तालीमद्वारे प्रात्यक्षिक करून दर्शविण्यात आले. नागरिकांनी जागरूक राहून दहशतवादासंबंधी काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे 07232-242700 आणि डायल 112 वर कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.