प्रफुल्ल व्यास,
वर्धा,
Wardha News : सावरकर आणि टिळक दोघांनीही देशासाठी लढा दिला. सावरकरांना काळ्या पाण्याची तर टिळकांना मंडालेच्या तुरंगाची शिक्षा झाली होती. वर्धेत सावरकर प्रेमींचा विजय झाला. परंतु, टिळकप्रेमी कुठेतरी मागे पडले. सावरकर आज तुमचे भाग्य उजळले, टिळकांचे काय? त्यांच्यापुढे उभ्याने लघवी होते काय, नपच्या दुर्लक्षाने तेथे कचरा सडतो, दारूही ढोसली जाते काय अरे काय होत नाही टिळक तुमच्या पुतळ्यापुढे!

वर्धा शहराने गेल्या काही महिन्यांमध्ये कात टाकली आहे. मोठे गोजीरवाणे शहर होते आहे. प्रशासनही सजग आहे. दररोज समस्यांचा निपटारा होतो आहे. मोठा आसामी येणार असेल तर रस्त्यावरचे अतिक्रमण हटवल्या जाते. सारे काही चांगले होते आहे. पुतळ्यांचेही नशीब पालटले आहे. नगरपालिकेच्या सौजण्याने तयार करण्यात आलेल्या सावरकर उद्यानात सावरकरांचा पुतळाही उभा झाला. सावरकर प्रेमींनी त्यासाठी फत काळ्या पाण्याची तेवढी शिक्षाच भोगली नाही. ते सौंदर्यीकरण शेवटास नेले. परंतु, शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गोलबाजारात अगदी श्रीराम मंदिरापुढे असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला नगर पालिकेने जणू दुर्गंधीची शिक्षाच सुनावली आहे. शहरात कानाकोपर्यात असलेल्या पुतळा आणि परिसर तरी स्वच्छ आहे. परंतु, टिळकांच्या पुतळ्याकडे सामान्य नागरिकच काय नगर पालिकाही वळून बघत नाही. मध्यंतरी टिळक स्वच्छता समितीची निर्मिती झाली. दर दर रविवारी मकरंद उमाळकर आणि त्यांचे काही सहकारी पुतळा परिसरातील उच्च शिखरावर जमा झालेला कचरा स्वच्छ करीत होते. परंतु, त्यांना फारसा प्रतिसाद न मिळाल्याने टिळकांना पुन्हा रविवारचे तेवढेही सुख मिळाले नाही.
जाजोदिया परिवाराने बगीच्यासाठी दानात दिलेल्या जागेवर नगर पालिकेच्या वतीने तत्कानील नगराध्यक्ष रमेश शेंडे यांनी १८ मे १९८५ रोजी लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला होता. त्याच परिसरात भाजी बाजारही भरतो. भाजी बाजारातील कचरा, सडलेला भाजीपाला त्याच ठिकाणी आणून टाकल्या जातो. त्या परिसरातील काम करणार्यांना लघुशंकेसाठीही टिळकांच्या पुतळ्याचा आसरा घ्यावा लागतो. सायंकाळी त्याच नव्हे तर शहरातील काही दारूडे टिळकांच्या साक्षीने दारूचा प्याला रिचवतात. वर्धा नगर पालिकेत तब्बल साडे सहा वर्षे भारतीय जनता पार्टीचा आणि प्रखर हिंदुत्त्ववादी नगराध्यक्ष होता. परंतु, आजही टिळक जयंती किंवा पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला नगर पालिकेला साफ सफाई करून देण्याची विनंती करावी लागते. टिळक याचसाठी तुम्ही मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य लिहिले असेल. या राजकारणाचे रहस्य उलगडण्यापूर्वी. टिळक तुम्हालाच कदाचित शासन आणि प्रशासनाच्या स्वप्नात जाऊन स्वत:ची सुटका करून घ्यावी लागेल. अगदी वर्धेतील राम मंदिर तुमच्या पाठीशी असले तरी!
तरुण भारतचा पुढाकार
गोल बाजारात असलेल्या टिळकांच्या पुतळा परिसराची स्वच्छता होण्यासाठी तरुण भारतमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या परिसराचे सौंदयीकरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. तत्कालीन मुख्याधिकारी राजेश भगत यांनी एक चबुतरा उभा करून टिळक पुतळ्याची उंची वाढवल्याने फत टिळकांच्या नाकापर्यंत कचरा पोहोचू नये एवढे प्रयत्न केले. आज ११ मे रोजी दुपारी २ वाजताही टिळक कचर्याच्याच विळख्यात होते.