कालेश्‍वर येथे सरस्वती पुष्कर महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

13 May 2025 18:35:44
सिरोंचा, 
Saraswati Pushkar Festival महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील कालेश्‍वर येथे गुरुवार, 15 मेपासून सुरु होणार्‍या सरस्वती पुष्कर महोत्सवासाठी भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती अपेक्षित असून, या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सुरक्षा उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. हा महोत्सव 26 मे पर्यंत चालणार असून, गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर श्रद्धाळू संगमस्नानासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत.
 

sfgfdsfs 
 
त्रिसंगम स्थळ असलेल्या कालेश्‍वरचे धार्मिक महत्त्व फार प्राचीन असून, दर 12 वर्षांनी सरस्वती नदीस मिळणारे पुष्कर पर्व यंदा या स्थळी साजरे होत आहे. 2022 मध्ये प्राणहिता नदी येथे पुष्कर लाभला होता. भारतीय खगोलशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाच्या राशीपरिवर्तनानुसार या पवित्र नद्यांना पुष्कर काळ प्राप्त होतो. संगमस्नान, दानधर्म, अभिषेक, गोदान, प्रवचन, भजन-कीर्तन, महाआरती, कालेश्‍वरेश्‍वराचे दर्शन यांसह विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम या कालावधीत पार पडणार आहेत. यंदाच्या सरस्वती पुष्कर महोत्सवासाठी विशेष गर्दी होणार असल्याने तेलंगणा सरकारने युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे. वाहतूक नियंत्रण, तात्पुरती निवासव्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता सुविधा, प्राथमिक उपचार केंद्रे, पिण्याचे पाणी, शौचालयांची उभारणी, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंसेवकांची नेमणूक अशा विविध बाबतीत अंमलबजावणी करण्यात येत आहे.Saraswati Pushkar Festival
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिला पोलिस, दंगा नियंत्रण पथके, सशस्त्र पोलिस, वाहतूक पोलिस, जलद प्रतिसाद दल आणि विशेष शाखा अधिकार्‍यांची तुकडी घटनास्थळी कार्यरत आहे. पोलिस नियंत्रण कक्ष आणि मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी व्हिज्युअल मॉनिटरिंगसह गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत.
या महोत्सवात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, भामरागड, चंद्रपूर, बीजापूर, कुमूरम भीम आदी परिसरातून नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0