शासनाने दुरावले बजाजने कुरवाळले; ४० विहिरींचे काम पूर्णत्वास!

14 May 2025 21:56:21
वर्धा, 
Jamnalal Bajaj Seva Trust : शेती भरपूर असूनही सिंचनाची सोय नसल्याने शेतकर्‍यांना एकाच उत्पादनात समाधान मानावे लागते. त्यामुळे ५ ते १५ एकर शेती असलेल्या शेतकर्‍यांना विहीर खोदून देण्याकरिता जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. यातून पहिल्याच वर्षी एप्रिल अखेरपर्यंत ४० विहिरी पुर्णत्वास गेल्या असून शेतशिवार आता पाणीदार होऊन शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. १५ एकरपर्यंतचे शेतकरी शासनाच्या निकषात बसत नसल्याने त्यांना विहीर खोदताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या मध्यम शेतकर्‍यांच्या मदतीला बजाज सेवा ट्रस्ट धावून गेल्याने शासनाने नाकारले आणि बजाजने कुरवाळे असेच म्हणावे लागेल.
 
 
 
 
JLKJMLK
 
 
 
शासनाकडून शेतकर्‍यांना विहिरी खोदून देण्याची योजना आहे. पण, या योजनेपासून ५ ते १५ एकरवाले शेतकरी लांबच आहे. त्यामुळे शेती असुनही पैशाअभावी शेतकरी विहीर खोदण्यास असमर्थ ठरतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक ताळमेळ जुळत नसल्याने विहिरीला पाणी लागणार की नाही, पाणी लागले नाही तर खर्च व्यर्थ जाणार, या भीतीपोटी शेतकरी हिंमत करीत नसल्याने जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने पुढाकार घेतला. शेतकर्‍यांच्या दहा टक्के सहभागातून विहीर खोदून देण्याच्या कामास फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात केली. एप्रिलच्या अखेरीस तब्बल ४० विहिरींचे खोदकाम आणि बांधकाम पूर्ण करुन शेतात पाण्याची सोय करुन दिली आहे. त्यामुळे आमच्या जीवनात मोठा बदल होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
 
 
या उपक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्‍यांच्या शेतातील विहीर खोदण्याचे ठिकाण बजाज तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापक आणि आचार्य श्रीमन नारायण पॉलिटेनिकच्या तंज्ज्ञांकडून वैज्ञानिकदृष्ट्या तपासले जातात. त्यामुळे विहिरीला साधारणत: २५ ते ३० फूटपासूनच पाणी लागायला सुरुवात होते. काही ठिकाणी ३० फुटापर्यंत भरपूर पाणी लागले आहे. शेतकर्‍यांकडून दहा टक्के अर्थसहभाग घेऊन २२ फूट व्यास आणि ४० फूट खोल विहिरीचे खोदकाम करुन दिले जाते. त्यानंतर बांधकामाचा खर्च हा शेतकर्‍यांना करायचा आहे.
 
 
विहीर बांधकामासाठी लागणारा खर्च पाच लाखाहून तीन लाखावर आला आहे. त्या काळी जानकीदेवी बजाज या स्वत: कूप दानकरिता निधी गोळा करायच्या. त्यांच्याच कार्याला आम्ही पुढे व्यापक रुप देऊन शेतकर्‍यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करुन देत आहोत. यंदा ४० विहिरी पूर्ण झाल्या असून सन २०२६ मध्ये १०० विहिरींचे उद्दिष्ट आहे. ज्यांनी विहिरीचे खोदकाम केले त्यांना बांधकामाकरिता बँकांनी कर्जपुरवठा केला आणि महावितरणने विद्युत जोडणी दिल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव यांनी दिली.
....चौकट...
कोणत्या तालुयात किती विहिरी
तालुका विहिरींची संख्या
समुद्रपूर १३
हिंगणघाट १०
देवळी ०८
वर्धा ०६
सेलू ०२
आर्वी ०१
....चौकट पुर्ण...
Powered By Sangraha 9.0