मुंबई,
Pakistan नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधत जोरदार प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार भारताविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करत असून, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा २०१९ मधील वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान
२०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी ताब्यात गेले होते. संपूर्ण भारत त्यांच्या सुखरूप परतीसाठी प्रार्थना करत असताना, वीणा मलिकने ट्विटरवर अभिनंदन यांची खिल्ली उडवत वादग्रस्त पोस्ट केली होती. तिने अभिनंदन यांचा फोटो शेअर करत लिहिले होते, “तुम्ही नुकतेच पोहोचलात आणि पाहुणचार म्हणून तुमचे खूप चांगले वागणे झाले आहे.”
या पोस्टनंतर भारतातील अनेक सेलिब्रिटी संतप्त झाले होते. 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडनने प्रतिक्रिया देताना लिहिले होते, “अशा प्रकारचं ट्विट करणं अकल्पनीय आहे. हे खरोखरच दुःखद आहे.” तर अभिनेत्री स्वरा भास्करने वीणा मलिकवर जोरदार टीका करत लिहिलं होतं, “वीणा जी, तुम्हाला आणि तुमच्या आजारी मानसिकतेला लाज वाटली पाहिजे. आमचा अधिकारी एक हिरो आहे – पकडल्यानंतरही धाडसी, सभ्य आणि प्रतिष्ठित. किमान तुमच्या सैन्यातील मेजरने तरी काही शालीनता दाखवली पाहिजे.”या घटनेदरम्यान रणवीर सिंग, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनंदन यांच्या सुखरूप परतीसाठी प्रार्थना केली होती. आजही पाकिस्तानी कलाकारांचा भारतविरोधी पवित्रा आणि वीणा मलिकसारख्या व्यक्तींचा द्वेष पाहता, त्यांच्यावर लावलेली बंदी योग्यच असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.