शिरपूर बस स्थानक परिसरात जुन्या इमारतीला आग

५ दुकाने जळून खाक, २० लाखाचे नुकसान

    दिनांक :17-May-2025
Total Views |
शिरपूर जैन,
Shirpur Bus Stand येथील बसस्थानक परिसरात विजय धोंगडे यांच्या जुन्या लाकडी दुमजली इमारतीला अचानक आग लागून ५ दुकाने जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाळी पाच वाजता घडली. या घटनेत लघुव्यवसायीकांचे २० लाखाचे नुकसान झाले. शिरपूर बसस्थानक परिसरात विजय धोंगडे परिवाराची जुनी लाकडी माळवदाची दुमजली इमारत आहे. या इमारती मध्ये छोटे छोटे कप्पे करून धोंगडे परिवारातील दोघासह इतर तीन जणांची दुकाने होती. या इमारतीला १७ मे शनिवार रोजी सकाळी पाच वाजता दरम्यान अचानक आग लागली. हॉटेल व्यवसायिकाचे असलेल्या दोन सिलेंडरचाही आगीमध्ये स्फोट झाल्याने बघता बघता आगीने मोठे रुद्र रूप धारण केले व संपूर्ण दुमजली इमारतीला भक्ष्य केले.
 

fire 
 
अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत एकूण पाच लघु व्यवसायिकांचे २० लाखाचा वस्तू व शेतमाल इमारतीसह जळुन खाक झाला. अखेर मालेगाव नगरपंचायत च्या अग्नी दलाच्या वाहनाने आग विझविली. नैसर्गिक हवा घटनेवेळी पूर्णतः बंद असल्याने आग दुसरीकडे फैलू शकली नाही. अन्यथा याहून अधिक नुकसान झाले असते.Shirpur Bus Stand घटनेची माहिती मिळतात शिरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ताले, टाऊन जमादार संदीप निखाडे, पोलिस कर्मचारी हरिहर गावंडे, ब्राह्मण, वीज वितरणचे कर्मचारी विष्णू जहिरव हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटनेचा पंचनामा तलाठी जे. एन. साठे, गणेश गवळी यांनी केला.
मालेगाव नगरपंचायत च्या अग्निशमन दलाच्या वाहनाने कर्मचारी आग विझवित असताना बंबातील पाणी सरले त्यानंतर तात्काळ अशोक देशमुख यांच्या शेतातील पाईप लाईन वर अग्निशमन दलाचा बंब पुन्हा भरून आग पूर्णतः विझविली. बंब भरण्यासाठी विजय देशमुख प्रशांत देशमुख या भावंडांनी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना मदत केली.


या घटनेत विजय धोंगडे यांचा फोटो स्टुडिओ, प्रशांत घोंगडे यांची कलर मिसिंग दोन मशीन, दस्तऐवज लेखक चोथमल यांचे कॅम्पुटर प्रिंटर, सलून व्यवसायिक मारवाडी यांचे सलून साहित्य, चंदनशिव यांच्या मोटर रिवायडींग व्यवसायाचे साहित्य व काही मशीन, प्रकाश भालेराव यांच्या हॉटेलचा माल व साहित्य, राजू लहामगे याच्या चहाच्या दुकानांमधील दोन फ्रीज तर विशाल धोंगडे यांचा शेतमाल आगीचा घटनेत जळाला.

नाश्ता हॉटेल व्यवसायिक प्रकाश भालेराव यांनी नुकतेच दुसरीकडे असलेले आपले दुकान धोंगडे यांच्या जागेत आणले होते. अल्पावधीतच त्यांचे दुकान डोळ्यासमोर जळत असताना त्यांच्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.