चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात दोन ठार

18 May 2025 15:31:01
तभा वृत्तसेवा
मूल, 
tiger attack in Chandrapur चंद्रपुरात एकाच दिवशी वाघाने दोन लोकांवर हल्ला केला आहे. शेळीला चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार, 18 मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील शिवापूर चक सिंचाई विभागाच्या नहराजवळ उघडकीस आली. ऋषी शिंगाजी पेंदोर (63, रा. शिवापूर चक) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, दुसरी घटना तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार सकाळच्या सुमारास नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक 697 मध्ये घडली. मारोती नकडू शेंडे (64, रा. वाढोणा) असे मृतकाचे नाव आहे. 
 
 
tiger attack in Chandrapur
 
ऋषी पेंदोर हे शनिवारी शेळीला चारा आणण्यासाठी शिवापूर चक जंगलात गेले होते. परंतु रात्र झाली तरी ते घरी परतले नाही. याबाबत गावकर्‍यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने रात्री शोधकार्य सुरु केले. मात्र शोध लागला नाही. अखेर दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी 10 वाजता शिवापूर चक सिंचाई विभागाच्या नहराजवळ वाघाने खाल्लेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. डोके शिल्लक ठेऊन पूर्ण शरीर वाघाने फस्त केले होते. tiger attack in Chandrapur वनविभाग बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर व त्यांची चमू, पोलिस विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून शिल्लक असलेला मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणला. मृतकाच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाने आर्थिक सानुग्रह मदत केली. एकाच आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात 7 नागरिकांना वाघाने ठार मारल्यामुळे वनविभागाविरुद्ध जनतेत संतापाची लाट पसरली आहे.
 
दरम्यान, नागभीड तालुक्यात वाढोणा येथे तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मारोती शेंडे हे पत्नी कमल व इतर गावकर्‍यांसह रविवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी आलेवाही बीटातील वाढोणाच्या नियत क्षेत्रात गेले होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी गेले. ही घटना लक्षात येताच पत्नी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर गावकर्‍यांनी आरडाओरड केल्याने वाघाने आवळगावच्या झूडपी परिसराच्या दिशेने धूम ठोकली. tiger attack in Chandrapur घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मारोती शेंडे यांना वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागभीड तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या वाढत असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनेमुळे वाढोणा परिसरात भीतीचे वातावरण असून, वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0