तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
murder case : येथील सनराईज इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षकाची त्याच्या मुख्याध्यापक असलेल्या पत्नीनेच विष देऊन हत्या केली आहे. या प्रकरणात लोहारा पोलिसांनी आरोपी पत्नी मुख्याध्यापक निधी शंतनू देशमुख हिला ताब्यात घेतले आहे.
सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल याच शाळेतील शिक्षक शंतनू अरविंद देशमुख (वय 32) असे मृतकाचे नाव आहे. गुरुवार, 15 मे रोजी लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौसाळा जंगल परिसरात एक अनोळखी पुरुषाचे अर्धवट जळालेले प्रेत आढळून आले.
अज्ञात आरोपीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत माहिती काढत असताना दारव्हा मार्गावरील एक व्यक्ती काही दिवसांपासून शहरात नसल्याचे पोलिसांना कळले. त्याच्या मित्रांनी या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली.
मृतक शंतनू देखमुख (सुयोगनगर, दारव्हा रोड) असल्याची खात्री पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाèयांनी मृतक शंतनू यांची मुख्याध्यापक असलेली पत्नी निधी देशमुख (वय 23) हिच्याकडे विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तिने मंगळवार, 13 मे रोजी तिचा पती शंतनू याला विष देऊन मारून टाकले. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेतील व शिकवणीसाठी येत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने रात्री मृतदेह चौसाळा जंगल परिसरात फेकून दिला.
त्यानंतर निधी देशमुख हिने मृतदेहाची ओळख पटेल आणि पोलिस आपल्याला पकडतील या भीतीने पुन्हा विद्यार्थ्यांची मदत घेऊन बुधवार, 14 मे च्या मध्यरात्री चौसाळा परिसरात जाऊन मृतदेहावर पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी व अल्पवयीन मुले यांच्यातील मोबाईल संभाषणाची तांत्रिक माहिती घेतली असता त्यात सबळ पुरावा मिळून आला. मृतकाची पत्नी, आरोपी निधी शंतनू देशमुख हिला अटक करून पुढील तपास पोलिस ठाणे लोहारा यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणातील तिन्ही विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर करीत आहेत.
स्थागुशा पथकाचे परिश्रम
हा गुन्हा उघड आण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सहायक निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेढवे, आकाश सहारे यांनी परिश्रम घेतले.