आम्हाला तापी मेगा रिचार्ज प्रकल्प नकोच

21 May 2025 21:51:47
धारणी, 
Tapi Mega Recharge Project : शहराजवळच्या घुटीघाट (म. प्र.) गडगा-तापीच्या संगमावर प्रस्तावित तापी मेगा रिचार्ज प्रकल्पात मेळघाटची संस्कृती, पर्यावरण, नैसर्गिक वने, आदिवासी परंपरा आणि प्राकृतिक इकोसिस्टम बाधित होत असल्याने तथा देशातील मोठ्या धरणाचा उपयोग किंवा लाभ गृहित धरल्यास या प्रकल्पाला आमचा विरोध आहे, असे स्पष्ट मत तापी लोकमंचाचे अध्यक्ष डॉ. रविकुमार पटेल यांनी व्यक्त केले.
 
 
 
JLKJ
 
 
 
धारणी येथे स्थानिक पत्रकार आणि लोकमंचाच्या मुख्य कार्यकर्त्यांच्या एका विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. ब्रदर जोश कल्लेली, डॉ. विनोद मालवीय, यशवंतसिंग मौड, रामगोपाल मावस्कर, सुनील कानडे, सुशीला धांडे, मुन्नी जांबेकर, रामु जारेकर, श्रीचंद जांबेकर, हरिचंद भिलावेकर, इंदर धांडे, भुरेलापल, रामचंद कास्देकर, सरपंच गंगा जावरकर, बन्सी पराते, धनसिंग कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
स्थानिक स्तरावरील एकाही शासकीय कार्यालयात तापी मेगा रिचार्ज परियाजनेबद्दल माहिती उपलब्ध नसल्याने तथा तापी संचाने मागणी करुनही माहिती दिलेली नसल्याने योजनेबद्दल शंका व्यक्त होत आहे. प्रामुख्याने धारणी शहराजवळच तापी व गडगा नद्यांना अडविण्यात येत असल्याने धारणीकरांची झोप उडालेली आहे. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांचे आश्वासन पण आम्हाला माहिती देऊ शकलेले नसल्याने लोकमंचासमोर प्रकल्पाची वास्तविक माहिती, दस्तऐवज व कालव्याची रुंदी तथा लांबीची अधिकृत माहिती प्राप्त करण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत अ‍ॅड. बद्रर जोश यांनी व्यक्त केले.
 
 
अध्यक्ष डॉ. रविकुमार यांनी बुरहानपूर जिल्ह्यातील व इतर धरणांचे आपले अनुभव पत्रकारांसोबत शेअर करताना प्रारंभी प्रस्तुत केलेले उद्देश एकाही धरणाने साध्य केले नसल्याने तापी विषयी सुद्धा तेच घडणार, असे मत व्यक्त केले. तापी प्रकल्पातील दोन मोठ्या कॅनॉल मांडवा गावा जवळून किंवा दिया गावाजवळून प्रास्तावित आहे. याविषयी जनचर्चा सुरू असल्याने अनेक गावात दहशतीचे वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0