वर्धा,
Teacher Transfers : राज्यातील जिप शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी होणार्या सर्वसाधारण बदल्यांचे पडघम वाजले आहेत. २२ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू होऊन बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ नुसार तरतुदीनुसार विशेष संवर्ग एक, पती-पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन, बदली हक्क प्राप्त अवघड क्षेत्र संवर्ग तीन, सर्वसाधारण क्षेत्र संवर्ग चार याप्रमाणे या बदल्या होणार आहे. यासाठी शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम द्यावा लागणार असून ही सर्व प्रक्रिया जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
उन्हाळी सुट्या लागून काही अवधी उलटल्यानंतर आणि २०२५-२६ शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवधी असला तरी बदल्यांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता बदली प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू झाल्याने बदलीपात्र व बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भरलेल्या पसंती क्रमामधून आपल्याला कोणती मनासारखी शाळा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागीलवर्षी प्राथमिक शिक्षकांनी विशेष संवर्ग एक मध्ये जाण्यासाठी शक्कल लढवत दिव्यांग व घटस्फोटित प्रमाणपत्र सादर केले आणि सोयीच्या बदलीचा लाभ घेतला. मात्र, यावर्षीही बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व दोन मधील एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास त्याचे निलंबन, बडतर्फ करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्व शिक्षकांना प्रतीक्षा असणारी बदली प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी १५ जूनच्या आत होईल, अशी अपेक्षा आहे. सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाल्यास चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते, यासाठी बदल्या होणे आवश्यक असल्याचे स्वतंत्र समता शिक्षक संघाचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले.