मुंबई,
Suniel Shetty ‘बॉर्डर’सारख्या देशभक्तीपर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी पुन्हा एकदा शत्रूंचा सामना करताना दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या पार्श्वभूमीवर सुनील शेट्टीने एका खास संवादात देश, राजकारण आणि चित्रपटसृष्टीबाबत मोकळेपणाने विचार मांडले.

अलिकडेच झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली. यावर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टी म्हणाले, “प्रत्येकाची मतं स्वतंत्र असतात. मी माझं मत स्पष्टपणे मांडतो, पण अनेकदा त्याचा गैरवापर होतो. आपली समस्या अशी आहे की, देशाच्या हितासाठी काही बोललं की लगेच त्याला राजकारणाशी जोडलं जातं. लोकांना वाटतं की आपण एखाद्या पक्षाचा पाठिंबा देतो, पण खरंतर हा देशाचा प्रश्न असतो.”मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “मी चांगलं काम करणाऱ्यालाच मतदान करतो. त्याचा पक्ष कोणताही असो, देशहितासाठी काम करणाऱ्याला माझा सलाम असतो. मात्र कोणी योग्य काम करत नसेल, तर मी त्याला मतदान करत नाही आणि इतरांनाही तसेच सांगतो. शेवटी, रडण्यापेक्षा मतदान करून जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे.”
चित्रपटसृष्टीतील Suniel Shetty कलाकारांवर देशाच्या विषयांवर मौन बाळगल्याचे आरोप होतात, यावर सुनील शेट्टी म्हणाले, “माझ्या मते भारताला आपल्या चित्रपटसृष्टीइतकी आत्मीयता कोणत्याही इतर क्षेत्राबद्दल वाटत नाही. आमच्यामुळे भारताची सॉफ्ट पॉवर जगभर पोहोचली आहे. मग तो देशभक्तीपर, कौटुंबिक किंवा विनोदी चित्रपट असो. चित्रपट हेच आपल्या संस्कृतीचे, ओळखीचे खरे दूत आहेत. त्यामुळे आम्हाला राजकारणापासून दूर ठेवा आणि देशासाठी एकत्र या.”
‘केसरी वीर’मधून पुन्हा एकदा देशासाठी लढणारा वीर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सुनील शेट्टी, या भूमिकेद्वारे जनतेला देशभक्तीचा संदेश देण्यास सज्ज झाला आहे.