नवी दिल्ली,
Jyoti Malhotra पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या बांगलादेश दौऱ्याची आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संशय निर्माण झाले असून, तपास यंत्रणा विविध शक्यतांचा विचार करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राच्या बांगलादेश भेटीमागे पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकारी दानिश याचा काही सहभाग होता का, याची चौकशी सुरू आहे. तसेच बांगलादेशात असताना ज्योती दानिशच्या संपर्कात होती का, तिने त्याच्याशी संवाद साधला होता का, याबाबत देखील तपास केला जात आहे.
ज्योतीने Jyoti Malhotra बांगलादेशात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे तिच्या व्हिडिओद्वारे स्पष्ट झाले असून, हेच विद्यार्थी ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकारविरोधातील आंदोलनात आघाडीवर होते. त्यामुळे या दौऱ्याचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.तपास यंत्रणा आता यावरही लक्ष केंद्रीत करत आहेत की, बांगलादेशातील सत्तांतर प्रक्रियेत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची काही भूमिका होती का आणि ज्योतीला याची पूर्वकल्पना होती का. तसेच तिच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक पातळीवर तिला कोणी logistical मदत केली का, हेही शोधले जात आहे.
विशेष म्हणजे, बांगलादेशात भारतीय नागरिक सहसा दुर्गापूजेच्या सुमारास जातात, मात्र ज्योती फेब्रुवारी महिन्यातच बांगलादेशात गेली होती, हे तपास यंत्रणांच्या संशयाला कारणीभूत ठरत आहे.सध्या ज्योती मल्होत्रा पोलीस रिमांडमध्ये असून तिची चौकशी सुरू आहे. अलीकडेच तिच्या रिमांडमध्ये ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तिच्या बांगलादेश दौऱ्याशी संबंधित प्रत्येक पैलूचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे.