गडचिरोली,
Elephants in Gadchiroli चक्क गडचिरोली शहरात आज पहाटेच्या सुमारास दोन रानटी हत्तीने गडचिरोली शहरात प्रवेश एका व्यक्तीच्या दुकानाची नासधूस केल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसापासून रानटी हत्ती गडचिरोली शहरालगत असलेल्या गोगाव परिसरात फिरत होते आज पहाटेच्या सुमारास अचानक दोन हत्ती गडचिरोली शहरात दाखल झाले. नेमके कोणत्या रस्त्याने ते शहरात दाखल झाले हे कळले नसले तरी ते गोकुळ नगर परिसरात सर्वप्रथम दिसले.
या परिसरात राहणाऱ्या हरीश कामेडवार यांच्या दुकानाचे शटर फोडून आत ठेवलेल्या धान्याच्या पोत्याचे नुकसान केले. त्यानंतर या दोन्ही हत्तींनी आपला मोर्चा रेड्डी गोडाऊन चौकाकडे वळवला. त्यानंतर शिवाजी कॉलेजच्या मार्गाने हे दोन्ही हत्ती बस स्थानकात दाखल झाले. या संपूर्ण घटनेची माहिती वन अधिकारी नवघरे यांना मिळाल्यानंतर ते त्या हत्तीच्या मागावर होते. हे दोन्ही हत्ती धानोरा मार्गाने माडेतुकुम परिसरातून नदी मार्गाने दिभना परिसरात दाखल झाल्याची माहिती नवघरे यांनी तरुण भारतची बोलताना दिली आहे. Elephants in Gadchiroli हत्तीने नुकसान केलेल्या दुकानाचा पंचनामा वनविभागाकडून करण्यात आला असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे नवघरे यांनी सांगितले. हत्तीने कोणालाही इजा केली नसून ते सध्या दिभना परिसरात असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. हत्ती चक्क गडचिरोली शहरात दाखल झाल्याने शहरवासीयांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली आहे.