वर्धा,
Open transportation-food items : वर्धेकरांमध्ये सध्या बाहेरचे पदार्थ खाण्याची चढाओढ लागली आहे. वर्धेत महिन्या दोन महिन्यात एक नवीन हॉटेल सुरू होते. रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्यांची संख्या मोजणेही कठीण होईल. या सर्व खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेला अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वर्धेत उघड्यावर पदार्थ विक्रीचे प्रकार वाढू लागले आहेत. येथील पतंजली दुकानाच्या मागे असलेल्या बिकानेर या हॉटेलमध्ये खाद्य पदार्थ ज्या प्रकारे लोटगाडीवर आणण्यात आले तोप्रकार अतिशय किळसवाणाच म्हणावा.

वर्धा शहराची लांबी रूंदी वाढत चालली आहे. बाहेररून नोकरीसाठी येणार्यांची संख्याही आता वाढलेली आहे. शहराचा वाढता पसारा लक्षात घेता हॉटेलची संख्याही वाढते आहे. यासोबतच फुटपाथवर खाद्य पदार्थ विक्री करणारे गल्लोगल्ली झाले आहेत. साईनगर जवळील बजाज शाळा आणि रामनगर येथील मैदानावर लागणार्या चौपाटीवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना एका विशिष्ट आंडनावाचे कवच आहे. त्यांच्यात व्यवहार ठरलेला आहे. याशिवाय आर्वी नाका, बॅचलर रोडवरील फुटपाथवर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी सायंकाळी रांग असते आणि प्रत्येक ठेल्यावर खाणार्यांची तुफान गर्दी असते. यासोबत शहरातील मोठ्या हॉटेलमध्येही जेवणासाठी तेवढीच गर्दी असते. याशिवाय शहरात मिष्ठान्न विक्रीचेही काही नावाजलेली दुकानं आहेत. ग्राहक डोळे लावून त्याच दुकानातून मिठाई विकत घेतात. परंतु, काही व्यवसायिकांनी स्वच्छतेला हरताळ फासला आहे. काळे झेरॉसपुढे असलेल्या बिकानेर उपहार गृहात मालगुजारीपुर्यातील घरातून खाद्य पदार्थ आणल्या जातात. एका लोटगाडीतून आणण्यात आलेले खाद्यपदार्थ अगदी त्या लोटगाडीच्या चाकाजवळ उघडे
होते. त्या चाकाची घाण त्या खाद्य पदार्थावर उडत होती. तर दुसरीकडे बालाजी स्विटमार्ट आतून चकाचक असले तरी रस्त्यावर दुकानाच्या दर्शनी भागावर दिवसभर जिलेबी काढल्या जाते. हा चौक शहरातील प्रचंड वर्दळीचा आहे. त्यामुळे या चौकातून जाणार्या वाहनांची धुळ जिलेबीच्या कढईत जात नसेल काय याची काळजी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतो. अन्न व औषधी प्रशासन या उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यावर किती दिवस माया दाखवणार आहे. दिवाळी आणि दसर्यातच अन्न व औषधी विभागाला मिष्ठान्न विक्रीच्या दुकानाची आठवण होते. त्यानंतर या दुकान, हॉटेलची तपासणी करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.