पुणे,
Nilesh Chavan वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या निलेश चव्हाणला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
गेल्या नऊ दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण शुक्रवारी नेपाळ सीमेवर सापडला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी पहाटे पुण्यात आणले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सकाळी १० वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांची युक्तीवादातील मांडणी
निलेश Nilesh Chavan चव्हाण यांच्याकडे वैष्णवी हगवणे यांचे बाळ कसे गेले, याचा तपास करायचा आहे. तसेच त्याने कस्पटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी वापरलेली बंदूक जप्त करणे आवश्यक आहे. त्याच्याकडे हगवणे कुटुंबियांचा मोबाईल असल्याची शक्यता असून तोही हस्तगत करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. त्याशिवाय निलेश चव्हाणचा मोबाईल जप्त करून त्यातील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासण्याची गरजही पोलिसांनी अधोरेखित केली.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी या युक्तीवादाला प्रत्युत्तर देताना फक्त मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक नसल्याचे सांगितले. तसेच निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी थेट काहीही संबंध नाही. त्याच्यावर खोटे पुरावे तयार केले जात आहेत, असा दावा त्यांनी केला. निलेशचा नेमका सहभाग काय आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.न्यायालयाने दोन्ही बाजूंनी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दिवशी त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर बावधन पोलिसांकडून पुणे पोलिस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.