तहानलेल्या गावकऱ्यांसाठी साेडले पिकावर पाणी

सेवानिवृत्त शिक्षकाची अशीही दर्यादिली..!

    दिनांक :04-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा दिग्रस,
Digras पाण्याविना गावाची कल्पनाही करणे केवळ अशक्य आहे. पाणी हे मानवाचं जीवन तसंच ते गावाचंही. पण दुदैवाने अजूनही गावांच्या, शहरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटलेला नाही. उलट ही तहान वर्षाेगणती वाढतच असून दिग्रस शहर आणि तालुक्यात सध्या भयंकर पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईच्या झळा जसजसे ऊन वाढत आहे तसतसा अधिक तीव्र हाेत आहे. एप्रिल महिन्यातच तहानेने गावं, वाड्या, वस्त्या व्याकुळ झाल्या आहेत. ही तहान भागवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असले तरी गावातील काही दानशूर, कर्तव्यनिष्ठ माणसं आपल्या विहिरी गावासाठी खुल्या करून लाेकांना पाणी पाजत आहेत. मानवतेचा हा ओलावा एवढ्या प्रचंड उन्हातही सुखद धक्का देणारा आहे.
 

Digras Water was given to the villagers for the crops 
तालुक्यातील डेहणी हे गाव सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. उशाला असलेलं धरण, गावात असणारी काेट्यवधींची याेजना, तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत आपली तहान भागवू शकत नसल्याचा तीव्र संताप गावकरी व्यक्त करीत आहेत. येथील पाणीपुरवठा याेजनेवर तब्बल सव्वाकाेटी रुपयांचा निधी खर्ची पडला. मात्र याेजनेतून सव्वा लिटरही पाणी गावाला मिळाले नाही. गावकèयांचा हा संताप आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाने आपली विहीर लाेकांसाठी 24 तास खुली करून दिली आहे.
त्याला मानवतेची, माणुसकीची आणि आपुलकीची किनार आहे. आपली विहीर अधिग्रहित न करता, पाण्याचा काेणताही माेबदला आपल्याला नकाे अशी अतिशय मानवीय भूमिका त्यांनी घेतली आहे. विहिरीसाेबतच स्वतःचा माेटार पंप, पाईप आणि वीजही उपलब्ध करून दिली आहे. हे करतानाच आपली उन्हाळी पिके त्यांना गुंडाळून ठेवावी लागली. तसे दरवर्षी ते उन्हाळी भुईमूग घेतात. यावर्षी केलेल्या नियाेजनानुसार ते भेंडी, बरबटी, वांगी ही पिके घेणार हाेते. मात्र गावातील भीषण टंचाई पाहून त्यांचं मन वितळलं. गावतहान भागविण्यासाठी त्यांनी पिके थांबवून सरळ आपल्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीत साेडले आणि गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. दिवाकर इहरे यांची डेहणी गावालगतच वडिलाेपार्जित साडेतीन एकर शेती आहे. गरजेच्या वेळी चार घाेट पाणी विनासायास लाेकांच्या कामी पडलं, यापेक्षा माेठा माेबदला ताे काय असणार, असा उलट प्रश्न ते आपल्याला करतात. गावच्या सरपंच सपना राठाेड, सामाजिक कार्यकर्ते बबलू राठाेड, ग्रामविकास अधिकारी गुलाब चतुर आणि काही गावकऱ्यांच्या विनंतीवरून आपण विहीर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी पाणीटंचाईसाठी विहीर उपलब्ध करून दिल्याचे गावकरी कृतज्ञतापूर्वक सांगतात.
सेवानिवृत्तीनंतरही सेवा देणारे शिक्षक..
दिवाकर इहरे यांनी दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरसूल, कलगाव आणि तुपटाकळी शाळांमध्ये 32 वर्षे सेवा दिली आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून इहरे सर आजही ओळखले जातात. इंग्रजी विषयाचा दांडगा अभ्यास, मुलांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन, गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य, अतिरिक्त वर्ग घेऊन मुलांच्या इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करून घेणे, असे अनेक उपक्रम ते राबवत असत. दिवाकर इहरे डिसेंबर 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र मुलांचे नुकसान हाेऊ नये म्हणून त्यांनी मार्च 2019 पर्यंत तब्बल तीन महिने दरराेज नियमित शिक्षकाप्रमाणे शैक्षणिक कार्य करून सेवानिवृत्तीनंतरही सेवा दिली. त्यांचा सेवानिवृत्ती समारंभही अतिशय भव्यदिव्य असा झाला हाेता, हे विशेष..!