वर्धा,
Aarti Sarin : भविष्यातील आरोग्यसेवेचा आदर्श तुमच्या विद्यापीठाने आधीच निर्माण केला आहे. आता जागतिक दृष्टिकोन आणि मानवतेशी सुसंगत तंत्रज्ञान स्वीकारत हा आदर्श अधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. जागतिक कल्याणात योगदान देण्यासोबतच भारतीय सेनेत सामील होण्याचे आवाहन भारताच्या सर्जन व्हाइस अॅडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या महासंचालक डॉ. आरती सरीन यांनी केले.
सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षान्त आज ६ रोजी त्या बोलत होत्या. या समारोहाला अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांची विशेष उपस्थिती होती. समारोहात विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना आरोग्यसेवेची दीक्षा दिली. सावंगी मेघे येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या समारोहात प्रारंभी डॉ. प्रीती अदानी, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले आणि नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना डॉटर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
जग चांगले बनवण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करा. अडचणीत असलेल्यांना मदत करणे ही संस्कृती आहे. तुम्ही या विद्यापीठातून मिळविलेल्या ज्ञानाची, कौशल्यांची, करुणेची आणि इतरांच्या भवितव्याला आकार देण्यासाठी कटीबद्ध होण्याची आज जगाला गरज आहे, असे मनोगत डॉ. प्रीती अदानी मांडले. यावेळी डॉ. राजीव बोरले व डॉ. अभय दातारकर यांनीही भावना व्यत केल्या. मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सदिच्छा दिल्या.
दीक्षान्त समारोहाला कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्रधान सल्लागार सागर मेघे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. मंदार साने, आरती कुलकर्णी, अनिल पारेख, कार्यकारी संचालक डॉ. अनुप मरार, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, डॉ. संदीप श्रीवास्तव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अंकिता ठाकूरला १२ सुवर्णपदकांसह ३ रोख पुरस्कार
जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील भाग २ ची विद्यार्थिनी अंकिता ठाकूर हिला सर्वाधिक १२ सुवर्णपदकांसह एकूण १५ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. इशा सहाय या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला ८ सुवर्णपदकांसह एकूण १० पुरस्कार प्राप्त झाले. यासोबतच, स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. निखिल पंतबालेकुंद्री याला ७ सुवर्णपदके तर डॉ. सिमरन चौहान हिला ४ सुवर्णपदके प्राप्त झालीत. शरद पवार दंत महाविद्यालयातील गौरव हेमनानी याला ४ सुवर्णपदके, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाची साक्षी मुटे हिला ३ सुवर्णपदके, एक रौप्य पदक आणि ३ शिष्यवृत्ती पुरस्कार प्राप्त झालेत. समारोहात विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणार्या एकूण ८१ विद्यार्थ्यांना ११९ सुवर्ण, ६ रौप्य तर १२ कुलपती शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
दीक्षान्त समारोहात वैद्यकीय शाखेतील २३२ स्नातक व १६३ स्नातकोत्तर, दंतविज्ञान शाखेतील ८१ स्नातक व ३४ स्नातकोत्तर, आयुर्वेद शाखेतील ५९ स्नातक व ३९ स्नातकोत्तर, भौतिकोपचार शाखेतील ५५ स्नातक व २२ स्नातकोत्तर, नर्सिंग शाखेतील ८० स्नातक, २७ स्नातकोत्तर व पदविका १०, याशिवाय औषध निर्माणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील अशा एकूण १,७२४ विद्यार्थ्यांना दीक्षा देण्यात आली. यावेळी, ७३ पीएचडीप्राप्त आणि ३८ फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
संचालन डॉ. समर्थ शुल व डॉ. प्रमिता घरडे मुनतोडे यांनी केले.