तभा वृत्तसेवा
कळंब,
Indira College Yavatmal : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते इंदिरा महाविद्यालयाच्या ‘कदंबिनी 2024’ या वार्षिकांकास ग्रामीण भागातून प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुरुवार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि संपादक मंडळातील मार्गदर्शक प्राध्यापकांनी स्वीकारला.
‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर आधारित मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाचही भाषांमधून व्यापक माहिती विशद केल्याने हा अंक यापूर्वीच वाखाणण्यात आला होता. दर्जेदार लेख, कविता, कथा, व्यंगचित्रे, चुटके यांनी सजलेला हा वार्षिकांक भारताच्या प्राचीन ज्ञानस्रोतांवर आधारित विशेषांक म्हणून प्रकाशित झाल्याने त्याचे वाङ्मयीन मूल्य वाढले आहे.
सुबक छपाई, अनिल मोकासे या विद्यार्थ्याने तयार केलेले आकर्षक मुखपृष्ठ आणि अभिरुचीसंपन्न लेखनाची निवड ही या अंकाची काही वैशिष्ट्ये आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर तसेच डॉ. वीरा मांडवकर, प्रा. प्रशांत जवादे, डॉ. कैलाश नेमाडे, डॉ. वेद पत्की व प्रा. शीतल राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या साहित्यनिर्मितीचा हा अंक साकार झाला आहे.
स्नेहा वèहाडे, राम मेसेकर, शिफा खान, अनामिका भोयर, श्रद्धा दूधकोळ, गायत्री बिडवाईक, नुरुल इस्लाम मेहबूब शेख यांनी संपादकीय कार्य पार पाडले. इंदिरा महाविद्यालयाच्या वार्षिकांकाला सलग चौथ्या वर्षी विद्यापीठाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.