हिंगणघाट,
Government Medical College : जनआंदोलनाच्या रेट्यानंतर तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर हिंगणघाट येथे शासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. नियोजीत महाविद्यालयाकरिता समुद्रपूर तालुयातील जाम येथील कृषी विभागाचे जागेची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवड समितीच्या वतीने करण्यात आली होती.
अनेक महिने लोटूनही निवड केलेली जाम येथील कृषी विभागाची जागा हस्तांतरित न झाल्याने वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात पुढील कार्यवाही कासवगतीने सुरू होती. आता त्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. जाम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता कृषी मंत्रालयांतर्गत फलोत्पादन विभागाची जागा असल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर जागा हस्तांतरनाच्या दस्तावेजावर स्वाक्षरी होऊन हस्तांतरणाला मंजुरी मिळाली.
६ रोजी महाराष्ट्र शासन, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाचा हा जागा हस्तांतरणाचा जीआर निर्गमित करण्यात आला. यामुळे नियोजीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसंदर्भात पुढील कार्यवाहीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या शासन निर्णयांतर्गत कृषी विभागाच्या अखत्यारितीतील मौजे जाम येथील तालुका रोपवाटिकेच्या १२ हेटर आर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सलंग्नित ४३० खाटाचे रुग्णालय स्थापन करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभागास हस्तांतरित करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागाच्या आदेशानंतर जमीन वाटप करताना जमिनीचा नेमका कोणता हिस्सा प्रत्यार्पित करायचा यासंदर्भात जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी वर्धा यांचे सल्ल्याने जिल्हाधिकारी वर्धा जमिनीचे आरेखन करून व जागा निश्चित करून जागा हस्तांतरित करतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.