गडचिरोली,
Sharyu Topper बारावी बोर्डाच्या परीक्षेत यंदा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. देसाईगंज येथील महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी शरयू विलास ढोरे हिने 92 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले. मुलचेरा तालुक्याच्या सुंदरनगर येथील नेताजी सुभाष बोस उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी स्नेहानशू संजीव सरकार याने 91. 17 टक्के तर गडचिरोली येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजना कालिदास पदा हिने 90.67 टक्के गुण घेऊन चमकदार कामगिरी बजावली.
तसेच गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी जागृती जगदीश मेश्राम आणि चामोर्शी येथील राजर्षी शाहू महाराज स्कूल ऑफ सायन्सचा विद्यार्थी प्रिन्स रवींद्र वडेट्टीवार या दोघांनी 89.83 इतके समान गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील एमसीव्हीसी शाखेतून मदिहानाज पठाण हिने 85.67 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात बाजी मारली. मनात जिद्द, चिकाटी आणि ध्येय निश्चित करून त्याला परिश्रमाची जोड दिली तर यश हमखास मिळते, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.Sharyu Topper यंदाच्या निकालातही मुलांच्या तुलनेत मुलींनीच आपला दबदबा कायम ठेवला. या गुणवंतांवर शिक्षक, कुटुंबिय, नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.