वाशीम,
Water shortage तीव्र उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होत असतांना दुसरीकडे जिल्हावासीयांना पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्यामुळे वाशीमसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न बिकट झाला आहे. जिल्ह्यातील अर्धेअधिक लघू सिंचन प्रकल्पांनी तळ गाठला तर वाशीम, मंगरुळनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्या मध्यप्रकल्पात जेमतेम पाणीपुरवठा आहे. ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जलजीवन मिशन योजना सुरु केली. परंतु, ही योजनाही कुचकामी ठरली असल्याने शहरासह ग्रामीण जनता पाण्यासाठी उन्हाची पर्वा न करता दाहीदिशा भटकंती करत असल्याचे चित्र आहे.
वाशीम शहराला पाणी पुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्याने वाशीम शहराला बारा दिवसाआड, रिसोड शहराला पाच दिवसाआड, मंगरुळनाथ शहराला आठ दिवसाआड, कारंजाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे जिल्हावासीयांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. एकबुर्जी प्रकल्पात सद्यस्थितीत १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पातील पाणीसाठा पाहता आगामी दोन महिने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने १९९ गावासाठी २१४ उपायोजनेचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे.
जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत आहे. शहरासह अनेक गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. ग्रामस्थांना उन्हाची पर्वा न करता दुरवरून पाणी आणावे लागत आहे. काही गावात टँकरने पाणी पुरवठा होत असला तरी त्याचेही नियोजन कोलमडले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ लोकप्रतिनिधींनी पुढे यायला पाहीजे. मात्र, विद्यमान पालकमंत्री महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाच्या निमीत्ताने वाशीमला आले असता त्यांनी पाणी टंचाईबाबत कुठलेही ठोस निर्णय अथवा प्रशासनाला सूचना केल्या नाहीत. याशिवाय खासदार संजय देशमुख हे देखील वाशीमपेक्षा यवतमाळात अधिक सक्रीय असल्याचे चित्र आहे. आ. श्याम खोडे यांनी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाची बैठक घेतली असली तरी परिस्थिती जैसे थे आहे. एकंदरीत प्रशासनाचा हलगर्जीपणा लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. एवढे मात्र निश्चित.
वाशीम शहराला एकबुर्जी धरणातून पाणी पुरवठा होतो. आज या प्रकल्पात पाणी साठा कमी झाल्याने शहराला दर १० ते १२ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.Water shortage कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्या अडाण प्रकल्पातून शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मानोरा शहराला पाणी पुरवठा करणार्या अरुणावती प्रकल्पातून शहराला दर सात दिवसाआड पाणी पुरवठा तर मंगरुळनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्या मोतसावंग प्रकल्पातून शहराला दर ८ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. रिसोड शहराला पाणीपुरवठा करणार्या अडोळ प्रकल्पाची पाणी पातळी खालाावल्याने रिसोड शहरवासीयांना पाण्यासाठी आठ आठ दिवस वाट पाहावी लागत आहे. अजून मे आणि जून चा पंधरवाडा अद्याप बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची चिन्हे आहेत.