तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Rajinikanth Borale : दारू तस्करी, दारू दुकाने नियमभंग करून उघडणे-बंद करणे याकडे लक्षावधी रुपयांची लाच घेऊन दुर्लक्ष करणाèया निरीक्षक एस. एस. बोदमवाड आणि अधीक्षक नितेश शेंडे यांची ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी मंगळवार, 5 मे रोजी पत्रपरिषदेत केली.
पुढे बोलताना बोरेले म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बोदमवाड व अधीक्षक नितेश शेंडे आणि गेल्या दहा वर्षांतील माजी व वर्तमान पांढरकवडा निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यासाठी जबाबदार आहेत. हे सर्वजण दारू तस्कर वाईन शॉप आणि ठोक दारू परवानाधारकांकडून लक्षावधी रुपयांची लाच घेऊन वाईन शॉप, देशी दारू दुकान, ठोक देशी दारू व्यवसायींना पद व अधिकाराचा गैरवापर करून अभय देत आहे. अशा अनेक गंभीर मुद्यांची तक्राराची तपास ईडी आणि विक्रीकर व आयकर विभाग यांच्यामार्फत तपास करण्यात यावा यासाठी राज्य शासनाचे मुख्य सचिव, सचिव उत्पादन शुल्क, विभागीय आयुक्त आणि यवतमाळ जिल्हा दंडाधिकाèयांकडे पुराव्यानिशी तक्रार केळापूर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदारांमार्फत केली आहे.
परंतु दारू तस्कर हा एका पक्षाचा नेता असल्याने अधिकारी आणि इतर वरिष्ठ नेते मंडळी यांचा आशीर्वाद असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे खुलेआम दारू तस्करी वाईन शॉप परवानाधारक करीत आहेत. वाईन शॉप परवान्याच्या नावावर कोट्यवधी रुपयाची आणलेली दारू स्वतःच्या जवळील आणि नातेवाईक यांच्या बीअर बारमध्ये देऊन विक्री केल्याने 10 वर्षांत लक्षावधी रुपये विक्री कर व राज्य उत्पादन शुल्क बुडविले आहे. नियमानुसार दारू पिण्याचा परवाना आहे त्यांनाच दारू विक्री करण्याचा नियम आहे. परंतु लक्षावधी लिटर दारूची तस्करी आणि विक्री करण्यात आली आहे. परंतु दारू पिण्याचा परवाना अतिशय कमी लोकांकडे आहे. तस्करी करणारे व वाईन शॉप देशी दारू आणि बीअर बार परवानाधारकांकडून लक्ष्मीदर्शन घेऊन दारू व्यवसायींना पाठबळ देत आहेत.
दारू तस्कर वाईन शॉप मालकांकडून 10 रुपये 90 मिली प्रती बाटली, दारू तस्करीकरिता मुभा देणे, देशी दारू दुकानाकडून 5000 रुपये, बीअर बार कडून 3000 रुपये प्रती महिना हप्ता व नवीन परवाना देणे, ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता 4 ते 5 लाख रुपये लाच घेण्यात येते. याबाबत शुल्क उत्पादक निरीक्षक दारू तस्करी व दुकानांबाबत तक्रार करण्यासाठी केलेला मोबाईल कॉल उचलत नाहीत. उलट लगेच दारू तस्करी करणाèया वाईन शॉप परवानाधारकांना फोन करून माहिती देतात, असा स्पष्ट आरोप यावेळी बोरेले यांनी केला. हा सर्व प्रकार पद व अधिकाराचा दुरुपयोग करून आर्थिक स्वार्थापोटी आणि दारू तस्कर वाईन शॉप परवानाधारकांकडून लक्षावधी रुपयांच्या लक्ष्मी दर्शनामुळे केली जाते.
या प्रकरणात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व अधीक्षक या सर्वांचे ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’ तपासणे, त्यांच्या चल-अचल संपत्ती, बँक बॅलन्स, चारचाकी व दुचाकी वाहने, भूखंड, बंगले, त्यातील सुखसुविधा, फर्निचर, सुवर्ण दागिने आणि मोबाईल जप्त करणे, त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात यावे, असेही गंभीर मुद्दे रजनीकांत बोरेले यांनी तक्रारीत उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा यावेळी त्यांनी केली.
आरोप बिनबुडाचे : अधीक्षक नितेश शेंडे
सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांच्या आरोपांबाबत यवतमाळ येथील उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक नितेश शेंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, रजनीकांत बोरेले यांचे आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया दिली.