रेवसा मालू सिटीमध्ये होणार इस्कॉन मंदिर

-उद्या भूमिदान व भूमिपूजन समारंभ -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

    दिनांक :07-May-2025
Total Views |
अमरावती, 
ISKCON Temple : शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि मालू एंटरप्रायजेसचे संचालक असलेल्या मालू परिवाराच्यावतीने रेवसा मार्गावर स्थित मालू सिटीमध्ये इस्कॉन मंदिराकरिता स्व. प्रवीण व स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक लाख चौरस फुट जमीन दान देण्यात आली आहे. येथे इस्कॉन मंदिर ट्रस्टतर्फे बालकृष्ण धामच्या रुपात भव्यदिव्य व आकर्षक मंदिराचे निर्माण होणार आहे.
 
 
amt
 
 
 
मालु कुटुंबियांचे दान स्विकारत ईस्कॉनतर्फे मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ होत असून त्यासाठी ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मालू सिटीमध्ये भूमिदान आणि भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मालू सिटीमध्ये स्व. प्रवीण आणि स्व. प्रणम मालू स्मृतीद्वाराचेही भूमिपूजन होईल. मंदिराचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इस्कॉनचे महाराष्ट्र विभागाचे सचिव श्रील लोकनाथ स्वामी महाराज आणि भक्तिप्दम सौरभ प्रचारक स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मॉरिशस, सिंगापूर व अमेरिका येथून इस्कॉनचे अनेक प्रमुख सभासद किर्तन करण्याकरिता हजर राहणार आहेत. मालू परिवारा तर्फे दान देण्यात आलेल्या एक लाख चौ.फु. जमीनीवर इस्कॉनद्वारा आगामी तीन ते चार वर्षात मंदिराचे निर्माण पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल व संजय राठोड, खा. अनिल बोंडे, खा. बळवंत वानखडे यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
 
 
याप्रसंगी श्री रुख्मिणी जन्मोत्सव आणि २५ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यात सुमारे आठ ते दहा हजारांच्यावर भाविकांचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमस्थळी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जमीन देण्यासोबतच मालु परिवाराकडून मंदिरासाठी आर्थिक सहकार्यही करण्यात येत आहे. प्रवीण मालू यांच्या पश्चात त्यांच्या दोन कन्या प्रिया व पूर्वा तसेच दोन पुतणे वरुण व प्रज्वल मालू यांनी त्यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
 
 
राज्यातील दुसरे सर्वात मोठे मंदिर
 
 
रेवसा मार्गावर गजानन धामनजीक साकारणार असलेले हे ईस्कॉन मंदिर राज्यातील दुसरे तर अमरावती शहरातील पहिले सर्वात मोठे मंदिर ठरणार आहे. येथे मंदिरासोबतच सत्संग भवन, भक्त निवास, अतिथी निवास, संस्कार भवन, म्युजियम, अध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र, मुलांसाठी भक्त प्रल्हाद स्कुल व खेळाचे मैदान, युवकांसाठी अभ्यास केंद्र व सभागृह, मंडप आदींचे निर्माण करण्यात येणार आहे. येथे सर्व सोयीयुक्त गोशाळा उभारली जाणार आहे.