अपघातात तीन ठार, तीन जखमी

-क्रेन व करामध्ये झाली धडक -सावरखेड नजीकची घटना

    दिनांक :07-May-2025
Total Views |
मोर्शी, 
Amravati-accident : अमरावती - मोर्शी महामार्गावर सावरखेड नजीक झालेल्या क्रेन व कारच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांना अमरावतीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
 
 
 
amt
 
 
 
६ मे रोजी मध्य प्रदेशातील बिसनूर येथील काही जण आपल्या परिवारासह अमरावती येथे लग्नाचा बस्ता खरेदी करण्याकरता आले होते. तेथून मोर्शीकडे परत येत असताना सावरखेड नजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या हायड्रा क्रेन सोबत झालेल्या जबरदस्त धडकेमध्ये कारचालक निलेश बुधराव गव्हाळे (२८) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. वैभव सुरेश खासदेव (२६ रा. बिसनूर), गीता सुरेश खासदेव (५२), नीताशा सुभाष गव्हाळे (२८), मीना यशवंत खोसे (३१) व दिलीप केशवराव कडोकार (५०) या पाच जणांना गंभीर जखमी अवस्थेत अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. यापैकी गीता सुरेश खासदेव यांना मृतक घोषित करण्यात आले असून वैभव सुरेश खासदेव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
 
यातील दुर्दैवाचा भाग असा की, निलेश गव्हाळे याचे ३० एप्रिल रोजी लग्न झाले असून त्याचाच नातेवाईक असणारा वैभव खासदेव याचे येत्या २६ मे रोजी लग्न ठरले होते. त्या लग्नाच्या खरेदी करता हे सर्वजण अमरावतीला आले होते. खरेदी करून परत येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, मृतक व जखमींना गाडीतून काढण्याकरिता गाडीचे काही भाग कापून त्यांना बाहेर काढावे लागले. भर महामार्गावर झालेल्या अपघाताने जवळपास तासभर वाहतूक खोळंबली होती. या अपघाताची माहिती शिरखेड पोलिस स्टेशनला मिळताच तेथील ठाणेदार सचिन लुले यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. इतर जखमींवर अमरावती येथील एक्झॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे त्यांचे नातेवाईकांकडून समजले. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शिरखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.