विधानभवनाच्या विस्तारीकरणाला गती मिळणार

चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

    दिनांक :07-May-2025
Total Views |
मुंबई,
Chandrashekhar Bawankule नागपूर येथील विधानभवनाच्या विस्तारीकरणाला आता गती मिळणार असून यासाठी शासकीय मुद्रणालय आणि शहर पुरवठा विभागाच्या अतिरिक्त जागांचा वापर करण्यात येणार आहे. या दोन्ही शासकीय कार्यालयांच्या काही जागा विधानभवनाच्या विस्तारासाठी आवश्यक असून, त्या शासनाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
 
 

Chandrashekhar Bawankule  
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महसूल उपसचिव अश्विनी यमगर, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजीत हांडे, उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, व्यवस्थापक ब्रजेश दीक्षित यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
विकासासाठी पर्यायी 
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, मुद्रणालय आणि शहर पुरवठा विभागाच्या जागा शासनाच्या ताब्यात येण्याआधी या विभागांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येतील. त्या विभागांनी पुढील दोन दिवसांत नव्या जागांचा शोध घेऊन शासनास प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अंतिम स्वरूप देण्यात येईल.
 
 
पुरवठा सुरळीत राहील याची खात्री
 
 
शहर पुरवठा विभागासाठी निवडली जाणारी नवी जागा अशा ठिकाणी असावी, जिथून नागपूर शहरातील नागरिकांना धान्याचा पुरवठा सहज आणि वेळेत करता येईल. आवश्यक ते बांधकाम पूर्ण करूनच संबंधित जुनी जागा शासनाच्या ताब्यात घेतली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
 
 
झिरो माईल क्षेत्राचाही विकास
 
 
विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी मुद्रणालय आणि पुरवठा विभागाच्या उर्वरित जागांचा वापर करण्यात येणार असून, यामुळे या प्रकल्पात कोणतीही अडथळा राहणार नाही. याच परिसरातील झिरो माईल क्षेत्रालाही विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली. तसेच विस्तारलेल्या विधानभवनाच्या इमारतीमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांची सोय करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.एकूणात, नागपूर विधानभवनाचा विस्तार हा केवळ वास्तूवृद्धी न राहता, एक व्यापक प्रशासकीय आणि नागरी विकासाची दिशा ठरू शकतो, असे दिसून येत आहे.