वर्धा,
Fraud-Bhisi : व्यवसाय निधीच्या नावाखाली फसवणूक करून शहरातील २२ नागरिकांची २० लाख ४४ हजार ८८५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ ऑटोबर २०२१ ते १५ जून २०२४ दरम्यान घडली. या प्रकरणी वायगाव (निपाणी) येथील नरेश कांबळे (४८) यांच्या तक्रारीवरून ६ रोजी वर्धा शहर पोलिसात बोरगाव (मेघे) येथील गौतम देशभ्रतार, पत्नी कांचन, मुलगा रक्षक, मुली अंकिता आणि निकिता देशभ्रतार या एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नरेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देशभ्रतार कुटुंबीय ‘ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स बिझनेस फंड’ या नावाने व्यवसाय चालवत होते. याअंतर्गत सहा युनिट चालवण्यात आले. यासाठी प्रत्येक सदस्याच्या स्वाक्षरीचे ३ कोरे धनादेश आणि १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आधीच सुरक्षा म्हणून घेण्यात आला होता. ते भिसी बोली लावून चालवायचे. जमा केलेल्या रकमेतून बोलीची रक्कम वजा करून जो सर्वात जास्त बोली लावतो त्याला भिसीची रक्कम दिली जात होती. भिसीच्या रक्कमेतून कमीशन म्हणून २५०० रुपये कापून घेत होता. बोलीची रक्कम इतर सदस्यांमध्ये समान प्रमाणात वाटली जायची.
अशाचप्रकारे २५ सदस्यांचा तिसरा युनिट मासिक ५ हजार रुपयाप्रमाणे तयार करण्यात आला. तुकाराम कांबळे हे तिसर्या युनिटमध्ये सामील झाले होते. त्यांनी १५ जून २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत २१ महिन्यांसाठी रक्कम जमा केली. परंतु, त्याला देय असलेली ८४ हजार ६० रुपयांची रक्कम देण्यात आली नसून त्यांची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली. युनिट ३ मधील भिसीमध्ये अनेक नागरिकांची फसवणूक झाली. काही दिवसांनी युनिट ३ मधील भिसीमध्ये समाविष्ट असलेल्या वर्धा येथील मारुती चावरे यांची १ लाख १० हजार रुपये, सचिन पाटील १ लाख १५ हजार, अमोल पाटील १ लाख २० हजार आणि कांचन सहारे यांची ९५ हजार रुपयांनी फसवणूक झाली. असा एकूण २० लाख ४४ हजार ८८५ रुपयांची फसवणूक झाली आहे.
यासोबतच १ ते ६ युनिटच्या भिसीमध्ये समाविष्ट असलेल्या उषा भगत यांची १ लाख ५ हजार, रामा थूल ६० हजार, सुनीता गाडगे ९० हजार, मिलिंद कांबळे ६० हजार, चंद्रकांत कांबळे यांची ९५ हजार, अशोक शास्त्रकर यांची २५ हजार, बाबा नगारे ४ हजार, गाडगे ५ हजार, वाघमारे १२ हजार, ताराचंद म्हात्रे ९३ हजार ३८५, नरेश भगत ४२ हजार आदींची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नरेश कांबळे यांच्या तक्रारीवरून देशभ्रतार कुटुंबातील ५ सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षकांनी घेतली दखल
फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी प्रकरणाची दखल घेत अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक पुंडलिक भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूचे पोलिस उपनिरीक्षक सिनुकुमार बनोट, पंच टिके, चाफलेकर, सचिन पवार, आर्थिक गुन्हे शाखेचे शांताराम मुदमाळी, आदींनी आरोपींच्या घर आणि कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पीडितांच्या स्वाक्षरी असलेले १५९ धनादेश, ३२ कोरे स्टॅम्प पेपर, रकमेचे ७ चेक, २९ स्टॅम्प पेपर आणि १ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.