आता आगळिक केली तर पाकिस्तान जबर मार खाईल

-‘ऑपरेशन सिंदूर’ आवश्यकच

    दिनांक :07-May-2025
Total Views |
नागपूर, 
Shantanu Mukherjee : मंगळवारी मध्यरात्रीनंंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अतिशय नियोजनबद्ध, अभ्यासपूर्ण आणि आवश्यकच होती, पाकिस्तानने आता आगळिक केली तर भारतीय सैन्य सज्ज आहेच, पाकिस्तान जबर मार खाईल, अशी प्रतिक्रिया मेजर (निवृत्त) डॉ. शांतनू मुखर्जी यांनी व्यक्त केली.
 
 
 
Mejor-Shantanu-Mukharji
 
 
 
डॉ. शांतनू मुखर्जी हे राष्ट्रीय रायफल्समध्ये वैद्यकीय अधिकारी होते. पूर्वोत्तर भागात बंडखोरीविरोधातील कारवाई तसेच कारगील युद्धात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांना अनेक पदके प्राप्त झाली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत ते म्हणाले की, याची गरज होतीच. मुळात पहेलगामची घटना योग्य नव्हती, घडायला नको होती. पण, ते दहशतवादीच आणि त्यांना पाकिस्तान सैन्याचे पाठबळ. ही घटना म्हणजे दहशतवादाचा परिपाक. तो ठेचणे गरजेेचे झाले. या घटनेचा बदला घेत भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले.
 
 
अत्यंत नियोजनबद्ध, अभ्यासपूर्ण कॅलक्युलेटेड अशी ही कारवाई होती. पाकिस्तानमध्ये 100 किमी आत घुसून ही कारवाई झाली. नेमके दहशतवाद्यांचे तळ तेवढे सैन्याने टिपले. अशी कारवाई करायला धाडस, जिगर लागते आणि ती केवळ भारतीय सैनिकच दाखवू शकतात. या कारवाईत सर्वसामान्य जनता तसेच सैनिकांना कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही, लाहोर जवळ असूनही त्यावर हल्ला केला नाही, हेे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
आपल्याजवळील शस्त्रे, त्यांची क्षमता, ते वापरण्याचे तंत्रज्ञान, पाकिस्तानातील भौगोलिक स्थिती, हवामान आदींचासुद्धा अभ्यास केला गेला. त्यामुळे नेमके, अचुक लक्ष्य टिपता आले. केवळ हीच कारवाई नाही तर सिंधू, झेलम नद्यांचे पाणी थांबवणे, जागतिक स्तरावर राजकीय संबंध या तीन स्तरावर भारत पाकिस्तानवर कारवाई करीत आहे. भारतीय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स जबरदस्त ताकदवान आहेत. नेव्हीने आता समुद्रात नाकेबंदी केल्यास पाकिस्तानचे नाक दाबले जाईल. पाकिस्तान कोंडीत सापडला आहे. जागतिक स्तरावर तो एकटा पडला आहे.
 
 
घेरला गेलेला पाकिस्तान शहाणे असेल तर त्याने आतातरी भारताशी पंगा घेऊ नये. त्यानेे पुन्हा आगळिक केलीच तर भारतीय सैन्य सज्जच आहे. त्याचे जबर नुकसान होईल. त्याला श्वास घेणे कठीण होईल, याकडे शांतनू मुखर्जी यांनी लक्ष वेधले.