अमरावतीत मराठी साहित्य संमेलन घेण्याच्या हालचाली

07 May 2025 20:32:41
अमरावती, 
Anil Bonde : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे जानेवारी २०२७ मध्ये होऊ घातलेले मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्याची जन्मभूमी असलेले व प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांची नगरी अर्थात चांदूरबाजार-रिद्धपूर येथे होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खा. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून होणार्‍या या साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांची बैठक बुधवार ७ मे रोजी पार पडली. या बैठकीला साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
 
amt
 
 
 
विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीचे अध्यक्ष विलास मराठे, सचिव माधव पांडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा चिखले, अ‍ॅड. राजेंद्र पांडे, प्रा. राजेंद्र राऊत, प्रा. वानखडे, संजय पाखोडे, शुभम बायस्कार यांच्यासह अन्य या बैठकीला उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याची प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज, महानुभाव पंथीयांची काशी, मराठी साहित्याची जन्मभूमी अशी ओळख आहे.
 
 
अलीकडेच रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झाली. ही बाब लक्षात घेता अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे शंभरावे मराठी साहित्य संमेलन अमरावतीत व्हावे अशी संकल्पना खा. अनिल बोंडे यांनी साहित्यिकांसमोर मांडली. त्यांच्या या संकल्पनेला साहित्यिकांकडून भरभरून प्रतिसाद देण्यात आला. त्या अनुषंगाने आगामी काळात शंभरावे मराठी साहित्य संमेलन अमरावतीत व्हावे यासंदर्भातील हालचाली युद्धस्तरावर सुरू झाल्या आहेत. यासाठी समाजातील सर्व घटकातील संस्था नागरिक यांचा यामध्ये सहभाग घेतला जाणार आहे.
 
 
साहित्य संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेद्वारे ठराव घेऊन तो विदर्भ साहित्य संघ नागपूर यांना पाठवला जाणार आहे. रिद्धपूर-चांदूरबाजार येथील नियोजित जागेची देखील साहित्यिकांकडून पाहणी केली जाणार आहे. जून महिन्यात साहित्य संघाचे पदाधिकारी या दोन्ही ठिकाणी भेटी देऊन या संदर्भातील प्रस्ताव विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारणी समोर सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0