गडचिरोली,
Research Officer : गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थिनी स्नेहा भानारकर हिची प्रतिष्ठित टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथे संशोधन अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे.
स्नेहा ही गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील असून ती अत्यंत कष्टाळू, अभ्यासू आणि समाजकार्याशी बांधिलकी असलेली विद्यार्थीनी आहे. तिने गोंडवाना विद्यापीठामधून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने अडीच वर्षात कुरखेडा तालुक्यातील 27 गावांमध्ये वन हक्क कायदा 2006 अंतर्गत प्रभावीपणे काम करत अंमलबजावणी केली.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया तिने यशस्वीपणे पार पाडली. तिच्या या यशामुळे ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. स्नेहा नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांच्या उपजीविकेच्या विकासासाठी वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर आधारित प्रकल्पात काम करणार आहे.