तभा वृत्तसेवा पुसद,
Sanjay Deshmukh महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने खा. संजय देशमुख यांनी पुसद येथील जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली आणि कार्याची प्रशंसा करीत भविष्यातील सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
संस्था 2009 पासून यवतमाळ जिल्ह्यात पीएलएचआयव्ही समुदायाधारित संस्था (सीबीओ) म्हणून कार्यरत असून, दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या नागरिकांसाठी कार्य करीत आहे. यामध्ये समाजप्रबोधन, समुदाय संघटन, बालगृह, महिलांसाठी आई मला वाचव उपक्रम अशा अनेक समाजहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. संस्थेच्या प्रयत्नांमुळे समाजातील अनाथ, एकलपालक, विधवा, विधुर, दुर्धर आजारांसह जीवन जगणारा व दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचलेली सेवा हा समाज परिवर्तनाचा दिशादर्शक ठरत आहे.
या कार्याची Sanjay Deshmukh माहिती घेतल्यानंतर खा. संजय देशमुख म्हणाले, संस्थेचा संघर्षमय प्रवास हा मन हेलावणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी संस्थेच्या कार्याला सीएसआर व एसएसआर निधी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संस्थेने घेतलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे. या संस्थेच्या मागे पालकत्व स्वीकारून, शासन दरबारी त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अॅड. आशिष देशमुख, रंगराव काळे, राजू वाकडे, विजय बाबर, राहुल सहारे, गजानन तोडक, सय्यद अब्बास, अमित आडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे कर्मचारी रमेश फुले, प्रियंका पांढरे, सविता गाडे, वंदना घुमणार, प्राची इंगळे, भगवान भिसे, सतीश दातीर, संजय वर्मा, देविदास मोरे यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. संचालन लक्ष्मी पद्मे यांनी, प्रास्ताविक व आभार पतसंस्थेचे अध्यक्ष बिपीन पवार यांनी मानले.