श्री बालाजी वार्षिकोत्सव कार्यक्रम 2025

मृत्यूची कायम भिती नष्ट करणारे पुराण म्हणजे भागवत : जान्हवी डगावकर

    दिनांक :07-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Shri Balaji Anniversary जन्माला आलेला जीव जन्मभर मृत्यूचं सावट घेऊन जगत असतो. मृत्यू हा अटळ आहे हे माहित असूनसुद्धा केवळ आणि केवळ भीती ! याला काय जीवन म्हणायचं, नाही हे जीवन नाही हसतहसत जगणं म्हणजे जीवन, प्रत्येक क्षण आनंदात जगणं म्हणजे जीवन. मरणोपरांत मृत्यूचा उत्सव होणे त्याला म्हणतात जीवन. हे ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र, असे मौलिक विचार जान्हवी डगावकर यांनी व्यक्त केले. त्या श्री बालाजी वार्षिकोत्सव कार्यक्रम 2025 मधील प्रथम पुष्प सादर करताना बोलत होत्या.
 
 
Shri Balaji Anniversary
 
निरूपण करताना त्या म्हणाल्या, चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण देणारा देश म्हणजे भारतभूमी. मृत्यूची भिती घालवायची असेल तर भगवंताचे अठरा हजार श्लोक हे तारक मंत्र आहेत. सतरा पुराणाची निर्मिती केल्यानंतरसुद्धा भगवान व्यास अस्वस्थ होते, हताश होते. आणि नारदाच्या उपदेशाने त्यांनी अठराव्या पुराणाची निर्मिती केली. ते पुराण म्हणजे भागवत होय. ‘मृत्यूची कायम भिती नष्ट करणारं पुराण म्हणजे भागवत’ असे प्रतिपादन भागवत प्रवक्त्या जान्हवी डगावकर यांनी केले.
श्री बालाजी Shri Balaji Anniversary देवस्थान मंडळ, वीर सावरकर नगर, बालाजी सोसायटी येथे श्री बालाजी वार्षिकोत्सव 2025 मध्ये भागवत महापुराणाचं प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भागवताची महती कथन केली. त्यांचे स्वागत अरूंधती कुळकर्णी यांनी केले. 4 मे पासून प्रारंभ झालेल्या ज्ञान यज्ञात 14 मे पर्यंत विविध धार्मिक उपक्रम होणार आहेत. 11 रोजी संध्याकाळी 6 वाजता बालाजी रथयात्रा, 12 मे ते 14 पर्यंत सकाळी 6 वाजता पंचसुक्त पवमान अभिषेक, स. 8 ते 12 होम- शीगणेश याग, देवीयाग, रूद्रयाग, पवमान याग व 14 रोजी पूर्णाहूती व महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता होईल.
 
 
या उपक्रमात, महायज्ञात सपत्निक यजमानपद स्वीकारायचे असेल त्यांनी देवस्थानात संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष विनोद देशपांडे, उपाध्यक्ष अविनाश कुळकर्णी, सचिव अविनाश दाणी, विश्वस्त मधुकर पिंपळकर, चंद्रकांत काणे, अभय देशपांडे, प्रदीप भुरचंडी, वैशाली जोशी व संध्या देशपांडे यांनी केले आहे. सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. भागवत भगवान आरतीचे यजमानपद अविनाश कुळकर्णी व अरूंधती कुळकर्णी यांनी भूषविले.